जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरला असून अनेक ठिकाणी तो तोंडावरही पडला आहे. अशातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरबद्दल वक्तव्य केलं आहे. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम हटवण्याचा भारताने घेतलेला निर्णय जर मागे घेतला तरच भारतासोबत चर्चा होऊ शकते, असे ते म्हणाले आहेत. तसंच पुन्हा एकदा त्यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे.

काश्मीरप्रश्नी जगातील कोणीही हस्तक्षेप केला नाही तर अण्विक शक्ती असलेले दोन्ही देश युद्धाच्या जवळ पोहोचतील. काश्मीर मुद्द्यावरील चर्चेत प्रामुख्याने काश्मीरी लोकांना सहभागी केलं पाहिजे. परंतु भारताशी चर्चा तेव्हाच होईल, जेव्हा भारत काश्मीरवरील अवैधरित्या असलेला ताबा सोडेल. तसंच सैन्य परत बोलावेल आणि कर्फ्यू काढेल, असं इम्रान खान यांनी नमूद केलं आहे. द न्यूयॉर्क टाईम्समध्ये लिहिलेल्या लेखातून त्यांनी भारताला इशारा दिला. जर अन्य देशांनी काश्मीरप्रश्नी भारताला थांबवण्यासाठी पावले उचलली नाहीत तर संपूर्ण जगाला याचे परिणाम भोगावे लागतील, असेही ते म्हणाले.

मुस्लीमांवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा संयुक्त राष्ट्र शांत बसतो. जर काश्मीरमध्ये मरणारे मुस्लीम नसते तर जगभरात त्यावर आवाज उठला असता, असं इम्रान खान यापूर्वी देशाला संबोधित करताना म्हटलं होतं. एकीकडे संयुक्त राष्ट्रावर प्रश्न उपस्थित करतानाच दुसरीकडे काश्मीर मुद्दा पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेमध्ये उचलणार असल्याचे त्यांनी सांगितलं.