मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदच्या सुटकेला खुद्द पाकिस्ताननेच विरोध केला आहे. देशासाठी सईद धोकादायक आहे, असे पंजाब प्रांत सरकारला वाटते. पंजाबच्या गृह विभागानेच लाहोर हायकोर्टात ही माहिती दिली आहे. सईदची सुटका केली तर देशात अशांतता निर्माण होईल, अशी भीती सरकारने म्हटले आहे. सईदची नजरकैदेतून सुटका करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पंजाबच्या गृहविभागाने हायकोर्टात सईदच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. सईदला दहशतवादविरोधी कायद्यान्वये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्याला निधी मिळवण्यापासून रोखता येऊ शकते. दरम्यान, सईदला नजरकैदेत ठेवणे बेकायदा आणि निराधार आहे. त्यामुळे त्याची सुटका करण्यात यावी, असे सईदच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणाऱ्या आर्थिक मदतीत कपात करण्याची धमकी मिळाल्यानंतर सईदला नजरकैदेत ठेवण्यात आले. कोणताही खटला दाखल न करताच त्याला ताब्यात घेतले, असेही वकिलाने सांगितले. त्यावर एका व्हिडिओ क्लिपच्या आधारे सईदला नजरकैदेत ठेवण्यात आले असून या प्रकरणात अमेरिकेच्या दबावाचा उल्लेख करू नका, असे न्यायालयाने वकिलांना सुनावले.

सईदला यावर्षीच्या सुरुवातीलाच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्याच्या जमात-उद-दावा या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. या संघटनेने गेल्याच महिन्यात मिली मुस्लिम लीग नावाचा पक्ष स्थापन केला आहे. मात्र, पाकिस्तान निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यास नकार दिला आहे.