भारतीय महिला पत्रकाराची अमेरिकी काँग्रेसपुढे साक्ष

वॉशिंग्टन : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाकडे जगातील वृत्तपत्रांनी गेली तीस वर्षे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याची साक्ष, एका भारतीय महिला पत्रकाराने काश्मीरमधील मानवाधिकारविषयक परिस्थितीची चर्चा करणाऱ्या अमेरिकेतील एका समितीपुढे दिली आहे. अमेरिकी काँग्रेसच्या महिला सदस्याने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, या महिला पत्रकाराच्या वार्ताकनाच्या वस्तुनिष्ठतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे.

काँग्रेसने समितीपुढे साक्ष देण्यासाठी दिलेल्या निमंत्रणानुसार आरती टिकू सिंह या साक्ष देण्यासाठी अमेरिकेला गेल्या होत्या. अमेरिकन काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी इल्हान ओमर यांच्या या टीकेनंतर, त्या ‘अन्यायकारक’ वागत असून, काँग्रेसमधील सुनावणी पूर्वग्रहदूषित व पक्षपाती, भारताविरुद्ध रचलेली आणि पाकिस्तानच्या बाजूने असल्याचा आरोप सिंह यांनी केला.

गेल्या ३० वर्षांच्या संघर्षांच्या काळात, काश्मीरमध्ये पाकिस्तानने घडवून आणलेला इस्लामिक जिहाद व दहशत यांच्याकडे जगभरातील वृत्तपत्रांनी संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. काश्मीरमधील पाकिस्तानी दहशतीचे बळी ठरलेल्यांबद्दल बोलणे किंवा लिहिणे ही आपली नैतिक बांधिलकी असल्याचे जगातील कुठल्याही मानवाधिकार कार्यकर्त्यांला किंवा वृत्तपत्राला वाटत नाही, असे सिंह म्हणाल्या.

उत्तराखंड पोलिसांच्या कारवाईस सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, पत्रकाराला दिलासा

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील एका दूरचित्रवाहिनीने गेल्या वर्षी सर्वोच्च स्तरावरील कथित भ्रष्टाचार उघडकीस आणणारे एक स्टिंग ऑपरेशन केल्यामुळे संबंधित वाहिनीच्या प्रमुखासह इतरांविरुद्ध राज्य पोलिसांनी तीन प्रकरणांमध्ये सुरू केलेली फौजदारी कारवाई स्थगित करून सर्वोच्च न्यायालयाने संबंधित पत्रकाराला दिलासा दिला आहे. पत्रकार उमेश कुमार शर्मा व इतरांविरुद्ध खंडणी, फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे आणि इतर आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एक प्रकरण २००७ सालचे आहे.