पाकिस्तानने आज हत्फ ९ ऊर्फ नस्र या कमी पल्ल्याच्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्राचा पल्ला ६० किलोमीटरचा आहे. अत्याधुनिक अशा मल्टीटय़ूब लाँचरच्या मदतीने ही चाचणी घेण्यात आली. यापूर्वी त्याच स्वरूपाच्या साल्वो या क्षेपणास्त्राच्या चाचण्याही यशस्वी झाल्या आहेत. नस्र हे अधिक क्षमतेचे क्षेपणास्त्र असून त्याची युद्धक्षमता व प्रतिसाद क्षमता खूप जास्त आहे, असे या प्रक्षेपणानंतर काढण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. लष्करप्रमुख जनरल अशफाक परवेझ कयानी व इतर वरिष्ठ अधिकारी या क्षेपणास्त्राच्या चाचणी वेळी उपस्थित होते. जनरल कयानी यांनी सांगितले, की या हत्फ-९ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे पाकिस्तानची संरक्षण सिद्धता वाढली आहे.