डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानी नागरिकांना यावर्षीच्या दोन महिन्यात दिलेल्या व्हिसांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्य़ांनी घट झाली असून, भारतीय नागरिकांना जारी करण्यात आलेल्या व्हिसांची संख्या तुलनेने २८ टक्क्य़ांनी वाढली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी ज्या देशांच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली आहे, त्यात पाकिस्तान नसूनही ही घडामोड घडली आहे हे विशेष.

२०१६ सालच्या मासिक सरासरीच्या तुलनेत यावर्षी मार्च व एप्रिल महिन्यात पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेल्या नॉन- इमिग्रंट व्हिसांची संख्या ४० टक्क्य़ांनी घटल्याचे वृत्त एका पाकिस्तानी माध्यमाने अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या हवाल्याने दिले आहे.

ट्रम्प प्रशासनाने यावर्षी मार्चमध्ये ३९७३, तर एप्रिलमध्ये ३९२५ पाकिस्तानींना व्हिसा दिला. ओबामा प्रशासनाने गेल्या वर्षी याच काळात ६५३३च्या सरासरीने व्हिसा जारी केले होते. हे प्रमाण यावर्षीपेक्षा ४० टक्क्य़ांनी अधिक होते. यावर्षी मार्च महिन्यापूर्वी परराष्ट्र विभागाने व्हिसांची मासिक आकडेवारी न देता केवळ वर्षांचे आकडे जाहीर केले होते.

या तुलनेत, भारतीय नागरिकांना यावर्षी मार्चमध्ये ९७९२५, तर एप्रिलमध्ये ८७०४९ व्हिसा जारी करण्यात आले. गेल्यावर्षी भारतीय लोकांना दरमहा ७२०८२ च्या सरासरीने वर्षभरात ८६४९८७ व्हिसा जारी करण्यात आले होते.

नॉन- इमिग्रंट अमेरिकी व्हिसा मिळण्यात झालेली घट अनुभवणारा पाकिस्तान हा एकमेव मुस्लिम देश नाही. मुस्लिमबहुल अशा ५० देशांतील आकडेवारीचे विश्लेषण केले असता, गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत यावर्षी त्यांच्या नागरिकांना देण्यात आलेल्या व्हिसांच्या संख्येत २० टक्क्य़ांनी घट झाल्याचे दिसत आहे.