भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांच्या बदल्यात अफगाणिस्तानच्या कैदेतील दहशतवाद्याला सोपवण्याचा प्रस्ताव आल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा आहे, असे भारताने सुनावले आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी केलेल्या वक्तव्यावरून पाकिस्तान खोटे बोलत असल्याचे सिद्ध होते, असे भारताने म्हटले आहे.

न्यूयॉर्कमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसमवेत झालेल्या बैठकीत जाधव यांच्या बदल्यात अफगाणिस्तानच्या कैदेत असलेल्या दहशतवाद्याला सोपवण्याचा प्रस्ताव आपल्याकडे आला होता, असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मुहम्मद असिफ यांनी केला होता. पण दहशतवाद्याचे आणि प्रस्ताव देणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे नाव उघड केले नव्हते. असिफ यांच्या दाव्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहम्मद हानिफ अत्मार यांनी प्रसिद्धीपत्रक जाहीर केले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत भारताचा अथवा कोणत्याही भारतीय नागरिकाचा उल्लेख करण्यात आला नव्हता, असे स्पष्ट केले होते. यावरून भारताने पाकिस्तानला सुनावले आहे. पाकिस्तानचा आणखी एक खोटारडेपणा समोर आला आहे, असे भारताने म्हटले आहे.

पाकिस्तानकडून अनेकदा खोटे बोलले जाते. त्यात आणखी एका खोट्या वक्तव्याची भर पडली आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले. न्यूयॉर्कमध्ये असिफ आणि अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत द्विपक्षीय सहकार्यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे प्रसिद्धीपत्रकावरून स्पष्ट होत आहे. पण त्या बैठकीत भारत अथवा कोणत्याही भारतीय नागरिकाचा उल्लेख करण्यात आला नव्हता, असेही कुमार यांनी सांगितले.