पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यस्थानमधील एका सभेत बोलताना मुस्लिमांबाबत एक विधान केले होते. काँग्रेस पक्ष जास्त मुलं असणाऱ्यांना देशाची संपत्ती वाटून टाकेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर विरोधी पक्षाने जोरदार टीका केली आहे. यावर आता शिरोमणी अकाली दलाचे (बादल) प्रवक्ते परमबंस सिंह रोमाना यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

परमबंस सिंह रोमाना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची एक क्लिप एक्सवर (ट्विटर) शेअर केली आहे. त्यामध्ये म्हटले की, “भारत हा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक असणारा देश आहे. मात्र, आपल्यावर ज्यावेळी अन्याय होतो, तेव्हा आपण याबाबत विचार करतो. त्यामुळे आपल्या सर्वांचा हा दोष आहे. आज ते असतील तर उद्या आपणही असू, हे सर्व खूप त्रासदायक आहे”, असे परमबंस सिंह रोमाना यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं तिहार तुरुंगाच्या अधीक्षकांना पत्र, “माझी शुगर लेव्हल ३००…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसबाबत केलेल्या विधानानंतर पंजाबचे माजी मंत्री बिक्रम सिंह मजिठिया यांनीही या मुद्द्यावर एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटले की, “तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात आणि भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्यामुळे तुमचे विधान योग्य आहे का? मतांच्या ध्रुवीकरणासाठी किंवा त्या उद्देशाने केलेल्या या विधानाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत. मात्र, त्यांच्या या विधानातून ते निवडणूक हरत असल्याचे दिसते”, असे बिक्रम सिंह मजिठिया यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

राजस्थानमधील बन्सवाडामध्ये मोदींची रविवारी सभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, “जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की, देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ हे संपत्ती गोळा करून कुणाला वाटणार? ज्यांची जास्त मुलं आहेत त्यांना वाटणार, घुसखोरांना वाटणार. तुमच्या कमाईचा पैसा घुसखोरांना दिला जाणार का? तुम्हाला हे मान्य आहे का?”, असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित जनतेला केला होता.