आम आदमी पक्षाच्या नेत्या आणइ राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सहायकावर मारहाणीचा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली. भाजपाकडून या मुद्द्याचे जोरदार भांडवल करण्यात येत असून आम आदमी पक्षावर टीका करण्यात येत आहे. या दरम्यान स्वाती मालिवाल यांनी बुधवारी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट टाकून आणखी खळबळ उडवून दिली. “मला ‘आप’ पक्षाच्या वरिष्ठ नेत्याचा फोन आला होता. त्यांनी सांगितले की, माझ्या विरोधात वाईट बोलण्यासाठी पक्षातील प्रत्येक नेत्यावर दबाव आहे. तसेच माझे खासगी फोटो लीक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला पाठिंबा देणाऱ्यांना पक्षाकडून धमकावले जात आहे”, असा दावा मालिवाल यांनी केला.

दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालिवाल यांच्यावर १३ मे रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी हल्ला करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे सहायक बिभव कुमार यांनी मारहाण केल्याचा आरोप केल्यानंतर स्वाती मालिवाल यांनी तक्रार दाखल केली. दिल्ली पोलिसांनी बिभव कुमार यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

स्वाती मालिवाल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, ‘आप’च्या एका मोठ्या नेत्याने मला फोन करून पक्षात चाललेल्या चर्चेची माहिती दिली. मला शांत करण्यासाठी माझे फोटो लीक करण्यास सांगितले आहे. जे मला पाठिंबा देतील, त्यांना पक्षातून काढून टाकले जाईल, असे धमकावले जात आहे. काहींना पत्रकार परिषद घेण्याची तर काहींना सोशल मीडियावर पोस्ट लिहिण्याची जबाबदारी मिळाली आहे. अमेरिकेतील स्वयंसेवकांकडून काही माहिती काढून घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच आरोपीच्या जवळच्या पत्रकारांना माझ्यावर एका व्हिडीओ बनविण्यास सांगितले आहे.

स्वाती मालिवाल पुढे म्हणाल्या की, तुम्ही हजारोंची फौज जरी माझ्या विरोधात उभी केली तरी मी एकटी सर्वांशी लढेल. कारण माझी बाजू सत्याची आहे. पक्षातील इतर नेत्यांबाबत माझी नाराजी नाही. आरोपी खूपच शक्तीशाली माणूस आहे. पक्षातला मोठ्यातला मोठा नेताही त्याला घाबरतो. त्याच्याविरोधात जाण्याची कुणाचीही हिमंत नाही. त्यामुळे माझी कुणाकडूनही अपेक्षा नाही. फक्त दुःख या गोष्टीचे वाटते की, दिल्लीची एक महिला मंत्री आपल्या सहकारी महिलेची पत्रकार परिषदेत चारित्रहनन करत आहे. मी माझ्या स्वाभिमानाची लढाई लढत असून न्याय मिळेपर्यंत मी लढत राहिल.