रविवारी झालेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केवळ भाजपपुरता मर्यादित होता. मात्र आता लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती सरकारमधील विशेष सूत्रांनी दिली. या मंत्रिमंडळ विस्तारात एनडीएमधील घटक पक्षांना स्थान देण्यात येणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात दोन मंत्रीपदे मिळावीत, अशी अपेक्षा संयुक्त जनता दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल काही दिवसांपूर्वीच एनडीएमध्ये सहभागी झाला. एनडीएच्या पुढील मंत्रिमंडळ विस्तारात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल, अशी आशा संयुक्त जनता दलाला आहे. ‘सन्मानजनक ऑफर दिली गेल्यास आम्ही प्रतिसाद देऊ,’ अशा शब्दांमध्ये संयुक्त जनता दलाचे सचिव के. सी. त्यागी यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले.

पंतप्रधान मोदी त्यांच्या मंत्रिमंडळात अजून सहा मंत्र्यांचा समावेश करु शकतात. मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या ७५ मंत्री आहेत. यात २७ कॅबिनेट मंत्री, ११ स्वतंत्र प्रभार असलेले मंत्री आणि ३७ राज्यमंत्री आहेत. घटनेनुसार मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ८१ मंत्री असू शकतात. मोदींच्या मंत्रिमंडळात भाजपेतर पक्षांना सध्या फारसे स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे मित्रपक्षांची नाराजी टाळण्यासाठी मोदींकडून पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार केला जाऊ शकतो. या विस्तारात काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झालेल्या संयुक्त जनता दलासह अण्णाद्रमुकला स्थान दिले जाऊ शकते. या विस्तारात शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही केला जाऊ शकतो.

रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने सर्वात जुना मित्र असलेल्या शिवसेनेलादेखील डावलले. त्यामुळे शिवसेनेकडून तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली होती. एनडीएची हत्या झाल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली होती. ‘राष्ट्रपतीपद, उपराष्ट्रपतीपद अशा निवडणुकांवेळी भाजपला आमची आठवण होते. संसदेत विधेयक मंजूर करुन घेताना भाजपला आमची मदत हवी असते,’ अशा शब्दांमध्ये राऊत यांनी भाजपवर तोंडसुख घेतले होते.