पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. मन की बात कार्यक्रमातून संबोधित करताना मोदी यांनी कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्याचं स्मरण केलं. त्याचबरोबर भारतातील करोना विरोधी लढाईबद्दल दिलासादायक माहिती दिली. यावेळी मोदी यांनी येणाऱ्या १५ ऑगस्टला एक शपथ घेण्याच आवाहन भारतीयांना “मन की बात’मधून केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “पुढच्या वेळी ज्यावेळी आपण मन की बातमध्ये भेटू त्याच्या आधीच १५ ऑगस्ट येणार आहे. यावेळी १५ ऑगस्टही वेगळ्या परिस्थिती साजरा होईल. करोना महामारीच्या संकटामध्ये होणार आहे. माझं देशवासीयांना आवाहन आहे की, आपण स्वातंत्र्य दिनाला शपथ घ्यावी की, महामारीपासून स्वतंत्र होऊ. आत्मनिर्भर भारताचा संकल्प करा. काही नवीन शिकण्याचा आणि शिकवण्याचा संकल्प करावा. आपल्या कर्तव्यांचं पालन करण्याचा संकल्प करा. आपला देश आज ज्या उंचीवर आहे, तो अनेक महान नेत्यांच्या तपश्चर्येमुळे आहे. ज्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी आपलं जीवन समर्पित केलं. त्यांच्यापैकी एक आहेत लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांची १ ऑगस्टला शंभरावी पुण्यतिथी आहे. लोकमान्य टिळक यांचं जीवन आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या सगळ्या खूप काही शिकवते,” असं मोदी म्हणाले.

“आता युद्ध केवळ सीमेवरच लढलं जात नाही. देशातही लढलं जात. त्यामुळे प्रत्येकाला आपली भूमिका ठरवावी लागेल. मागील काही महिन्यांपासून देशानं एकजुटीन करोनाचा सामना केला. त्यामुळे अनेक शंका चुकीच्या ठरवल्या. देशातील रिकव्हरी रेट इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे. मृत्युदरही कमी आहे. एकाही व्यक्तीला गमावणं चुकीचं आहे. आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की, करोना अजूनही तितकाच घातक आहे, जितका सुरूवातीला होता. त्यामुळे काळजी घेणं हेच आपलं शस्त्र आहे,” असंही मोदी म्हणाले.