नरेंद्र मोदी, पंतप्रधान

अटलजी आता नाहीत.. मनाला ही गोष्टच पटत नाही. अटल जी माझ्या डोळ्यांसमोर आहेत.. अगदी अटलपणे! जे हात माझ्या पाठीवर विश्वासाची आणि शाबासकीची थाप देत होते, ज्या स्नेहबाहूंमध्ये मोकळ्या मनानं मला आपलंसं करीत होते, तो स्पर्श आजही स्थिर आहे. अटलजी यांची ही स्थिरता माझ्या मनाला अस्थिर करीत आहे. डोळ्यांत जणू दाह आहे, काहीतरी सांगावंसं खूप वाटतंय, खूप काही सांगायचंय, पण शब्दच मुके झालेत. मी स्वत:ला वारंवार सांगतोय, समजावतोय की अटलजी आता नाहीत.. पण लगेच या अमंगळ विचारांपासून स्वत:च स्वत:ला झटकून टाकतो. काय खरंच अटलजी नाहीत? नाही. मी त्यांचा तो आश्वासक स्वर माझ्या अंत:करणात घुमताना ऐकतो आहे, मग कसं मानू की ते आता नाहीत..

ते पंचतत्त्व आहेत. ते आकाश, पृथ्वी, जल, अग्नि, वायु सगळीकडे व्याप्त आहेत. ते अटल आहेत, ते प्रत्येक क्षणी आहेत. त्यांना जेव्हा प्रथम भेटलो होतो, तो प्रसंग जणू कालच घडल्यासारखा भासतोय. इतका मोठा नेता, इतका विद्वान माणूस. वाटे की जणू वेगळ्याच जगातला कुणीतरी समोर येऊन उभा ठाकला आहे. ज्यांचा इतका नावलौकिक ऐकला होता, ज्यांच्या साहित्याची इतकी जणू पारायणं केली होती, ज्यांच्या विचारांतून इतकं काही शिकलो होतो ; ते साक्षात माझ्यापुढे अगदी सहजभावानं उभे होते! जेव्हा त्यांच्या मुखातून माझ्या नावाचा प्रेमळ उच्चार ऐकला तेव्हा वाटलं की सारं काही भरून पावलं. त्यानंतर कित्येक दिवस माझ्या कानात त्यांनी मला मारलेली हाक निनादत होती. मी कसं मानू की तो आवाजच आज अस्तंगत झाला आहे?

कधी असं मनातही आलं नव्हतं की, अटलजींबद्दल असं काही लिहिण्यासाठी हातात लेखणी घ्यावी लागेल. देश आणि अवघं जग अटलजी यांना एक मुत्सद्दी धुरंधर राजकीय नेता, प्रवाही शैलीचा वक्ता, संवेदनशील कवी, विचारवंत लेखक, धडाडीचा पत्रकार आणि दूरदृष्टी असलेला लोकनेता म्हणून ओळखत होतं. पण माझ्यासाठी त्यांचं स्थान त्यापेक्षाही खूप वरचं होतं. त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली म्हणून नव्हे, तर माझं जीवन, माझी वैचारिकता आणि मी जपलेली मूल्यं यावर त्यांचा जो अमीट प्रभाव पडला, माझ्यावर जो विश्वास त्यांनी दाखवला, त्या विश्वासानं मला खंबीर केलं आहे, कोणत्याही परिस्थितीत अटल राहायला शिकवलं आहे.

आपल्या देशात अनेक ऋषी, मुनी, संत आणि महात्म्यांनी जन्म घेतला आहे. स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत देशाच्या विकासासाठीही असंख्य लोकांनी आपलं जीवन समर्पित केलं आहे. पण स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचं रक्षण आणि २१व्या शतकातील सशक्त, समर्थ भारताच्या उभारणीसाठी अटलजी यांनी जे काही केलं ते अभूतपूर्व आहे.

त्यांच्यादृष्टीनं नेहमीच राष्ट्रच सवरेपरि होतं. बाकी कशालाच महत्त्व नव्हतं. इंडिया फर्स्ट.. भारत प्रथम, हा मंत्रच त्यांचं जीवनध्येय होता. पोखरण देशासाठी अत्यंत आवश्यक भासलं तेव्हा देशावरील र्निबधांची आणि आपल्यावरील संभाव्य टीकेची त्यांनी पर्वा बाळगली नाही. कारण देशहितालाच अग्रक्रम होता. परमसंगणक मिळाले नाहीत, क्रायोजेनिक इंजिन मिळाली नाहीत, तरी पर्वा नाही. आम्ही स्वत: ती बनवू, आम्ही आमच्या बळावर, आमच्यातल्या प्रतिभेच्या आणि वैज्ञानिक कौशल्याच्या बळावर जे अशक्य ते शक्य करून दाखवू, हा निर्धार होता. आणि तो प्रत्यक्षात उतरलाही! दुनिया थक्क झाली.. केवळ ‘देश प्रथम’ या कट्टर भावनेचीच शक्ती त्यांच्या अंतरंगातून कार्य करीत होती!

प्रत्यक्ष काळाच्याही ललाटी नवे विधिलिखित नोंदवण्याची आणि जुने मिटवण्याची ताकद, हिंमत आणि आव्हानांच्या काळ्याकुट्ट मेघांनी आच्छादित आभाळी विजयसूर्याचा उदय घडविण्याचा चमत्कार केवळ त्यांच्याच अंत:करणात विलसत होता, कारण ‘देश प्रथम’ हीच त्यांच्या हृदयाची स्पंदनं होती. त्यामुळेच पराभव आणि विजय त्यांच्या मनावर परिणाम करीत नव्हता. सरकार स्थापन झालं तरी, सरकार एका मतानं पाडलं गेलं तरी, त्यांच्या स्वरात पराजयालाही गगनभेदी अशा विजयी विश्वासात परिवर्तित करण्याची अशी शक्ती होती की जिंकलेल्याही पराभवाचा दाह जाणवावा! अटलजींनी नेहमीच सामाजिक आणि राजकीय जीवनात नव्या वाटा निर्माण केल्या आणि प्रचलित  केल्या. ‘वादळातही ज्योत तेववण्याची’ क्षमता त्यांच्यात होती. अत्यंत सरळ मनानं, न डगमगता ते जे काही बोलत ते जनमानसाच्या थेट हृदयाला भिडत असे. काय बोलावं, किती बोलावं आणि शब्दांशिवायदेखील कसं बोलावं, यात ते अत्यंत माहीर होते.

देशाची जी सेवा त्यांनी केली, जगात भारतमातेच्या प्रतिष्ठेला त्यांनी जे स्थान मिळवून दिले, त्यासाठी त्यांना अनेकवार गौरवलंही गेलं आहे. देशानं त्यांना ‘भारतरत्न’ देऊन जणू आपलाच गौरव वाढवला. पण ते कोणत्याही विशेषणांच्या, कोणत्याही सन्मानांच्याही पलीकडे होते.

जीवन कसं जगावं, देशाच्या कसं उपयोगी पडावं, हे त्यांच्या जीवनातूनच दुसऱ्यांना प्रत्यक्ष शिकता आलं. ते म्हणत की, ‘‘आपण केवळ स्वत:साठी जगू नये, इतरांसाठीही जगावं. देशासाठी अधिकाधिक त्याग करावा. जर देशाची अवस्था दयनीय असेल, तर आपल्यालाही जगात मान मिळणार नाही. पण जर आमचा देश सर्वार्थानं सुसंपन्न असेल, तर जग आमचाही मान राखील!’’

देशातील गरीब, वंचित, शोषितांच्या जगण्याचा स्तर उंचावला जावा, यासाठी ते जन्मभर झिजले. ते म्हणत की, ‘‘गरिबी, दारिद्रय़ ही अभिमानाची गोष्ट नाही, तर ती आमची लाचारी आहे, विवशता आहे. या विवशतेला संतोष मानता येणार नाही.’’ कोटय़वधी देशवासियांना या विवशतेतून मुक्त करण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. गरीबांना अधिकार मिळवून देण्यासाठी आधारसारखी व्यवस्था, प्रक्रियांचे अधिकाधिक सुलभीकरण, प्रत्येक गावापर्यंत रस्तासंपर्क, स्वर्णिम चतुर्भुजसारख्या महामार्गयोजना, देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अशा गोष्टी त्यांच्या राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पात समाविष्ट होत्या.

आज भारत ज्या तंत्रज्ञानाच्या शिखरावर उभा आहे, त्याची आधारशिला अटलजींनीच रचली होती. त्यांच्या काळातील ते सर्वात दूरदृष्टीचे नेते होते. अर्थात ते केवळ स्वप्न द्रष्टे नव्हते तर कर्मयोगीही होते. कविहृदयाचे, भावुक मनाचे होते, तसेच पराक्रमी योद्धय़ाच्या मनाचेही होते. त्यांनी अनेक विदेश यात्रा केल्या. ते जिथे जिथे गेले तिथे त्यांनी कायमचे स्नेहबंध निर्माण केले आणि त्यायोगे भारताच्या हिताची आधारशिलाच स्थापित केली. ते देशाच्या विजयाचा आणि विकासाचा स्वर होते.

अटलजी यांच्या प्रखर राष्ट्रवादानं आणि राष्ट्रसमर्पणानं कोटय़वधी देशवासियांना नेहमीच प्रेरित केलं आहे. राष्ट्रवाद हा त्यांच्यासाठी नुसता घोषणेपुरता नव्हता, तर तो त्यांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग होता. ते देशाला केवळ एखादा जमिनीचा तुकडा मानत नव्हते. तर एक जिवंत, संवेदनशील असा विराट प्रदेश मानत होते. ते म्हणत, ‘‘भारत म्हणजे जमिनीचा तुकडा नव्हे, तर जीताजागता राष्ट्रपुरुष आहे!’’ हा केवळ शाब्दिक भाव नव्हता, तर संकल्प होता. त्यासाठी त्यांनी आपलं अवघं जगणं समर्पित केलं होतं. कित्येक दशकांचं त्यांचं सार्वजनिक जीवन हे याच विचारांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी व्यतीत केलं. आणीबाणीनं आमच्या लोकशाहीला जो कलंक लागला होता तो मिटवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न देश  विसरणार नाही.

त्यांच्यातील देशभक्तीची भावना, लोकसेवेची प्रेरणा त्यांच्या नावाप्रमाणेच अटल होती. देशप्रेमानं त्यांचं तन-मन जणू व्यापून टाकलं होतं. जनताच त्यांच्यासाठी आराध्य होती. भारताचा कणन् कण त्यांच्यासाठी पवित्र आणि पूजनीय होता. त्यांचा जितका गौरव झाला, त्यांना जितक्या उंचावर देशानं नेलं तितकीच त्यांची नाळ या मातीशी पक्की झाली. यशानं ते अधिकच विनम्र झाले. देवाकडे यश, कीर्तीची कामना अनेकजण करतात, पण केवळ अटलजीच होते जे म्हणाले,

हे प्रभु! मुझे इतनी ऊंचाई कभी मत देना। गैरों को गले ना लगा सकूं, इतनी रुखाई कभी मत देना।।

देशवासियांशी इतक्या सहजतेनं आणि सरळ मनानं जोडून घेण्याची त्यांची ही कामनाच त्यांना त्यांच्या सामाजिक जीवनात एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते.

ते पीडा सहन करीत, वेदना मूकपणे सोसत, पण सर्वावर केवळ अमृतसिंचनच करीत.. जन्मभर! जेव्हा त्यांना कष्ट असह्य़ झाले, तेव्हा ते म्हणाले की, ‘‘देह धरण को दंड है, सब काहू को होये, ज्ञानी भुगते ज्ञान से मूरख भुगते रोए!’’ ज्ञानमार्गानं त्यांनी अत्यंत असह्य़ वेदनाही सहन केली आणि विरक्त भावानं निरोप घेतला!

भारत त्यांच्या रोमारोमांत होता आणि विश्वाची वेदना त्यांचं मन भेदत होती. त्याच भावनेतून हिरोशिमाची वेदना त्यांच्या शब्दांतून पाझरली. ते खरं तर विश्वनायकच होते. भारतमातेचे खऱ्या अर्थानं विश्वनायक. भारताच्या सीमांपलीकडे भारताची दिगंत कीर्ती आणि करुणेचा संदेश पोहोचवणारे आधुनिक बुद्ध.

काही वर्षांपूर्वी त्यांचा जेव्हा सर्वोत्तम खासदार म्हणून गौरव केला गेला, तेव्हा ते म्हणाले होते की, ‘‘हा देश मोठा अद्भुत आहे. अनोखा आहे. कोणत्याही दगडाला शेंदूर माखून त्यालाही पूज्य मानलं जाऊ शकतं. त्याचीही उपासना होऊ शकते.’’

आपल्या गौरवाचा स्वीकार करताना स्वत:कडे कमीपणा घेणारी ही किती नम्र भावना! आपल्या कर्तृत्वाला, आपल्या कर्तव्यनिष्ठेला देशासाठी समर्पित करण्याच्या त्यांच्या वृत्तीने त्यांच्या व्यक्तित्त्वाचा मोठेपणाच प्रतिबिंबित होतो. देशवासियांना त्यांचा हाच प्रखर संदेश आहे. देशातील साधनं, देशातील क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवून आता आपल्याला अटलजींच्या स्वप्नांची पूर्तता करायची आहे. त्यांच्या स्वप्नातील भारत घडवायचा आहे.

नव्या भारताचा हाच संकल्प आणि हाच भाव मनात जागवत मी देशवासियांच्या वतीने अटलजींना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांना नमन करतो.