दादरीतील मुस्लीम व्यक्तीस घरात गोमांस असल्याच्या संशयावरून ठार मारणे आणि पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींच्या कार्यक्रमाला झालेला विरोध ह्या अतिशय दु:खद घटना असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याविषयी आपले मौन सोडले. मात्र, यामध्ये केंद्र सरकारची भूमिका काय आहे?, असा सवाल देखिल केला आहे. आनंद बाजार पत्रिका या वर्तमानपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी भाजप हा कधीच अशा घटनांचे समर्थन करणार नाही, हेदेखिल यावेळी स्पष्ट केलं. भारतीय जनता पक्षाने नेहमीच ढोंगी धर्मनिरपेक्षतेचा विरोध केला आहे, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. अशा घटनांचा आधार घेऊन विरोधी पक्ष राजकारणाचं ध्रुवीकरण करत असल्याचाही आरोप मोदी यांनी केला. तसेच चर्चेने सर्व समस्यांवर उपाय शक्य असल्याचंही ते म्हणाले. दादरीतील मुस्लीम व्यक्तीस घरात गोमांस असल्याच्या संशयावरून ठार मारण्याच्या प्रकरणावरून राजकारण बरंच तापलं. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भाजप नेते संगीत सोम, खासदार महेश शर्मा आणि एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसीयांच्यासोबत अनेक नेत्यांनी या गावाला भेट दिली. या प्रकरणाच्या वृत्तांकनासाठी त्या गावी गेलेल्या प्रसारमाध्यमांनाही गावक-यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलीसांतर्फे या प्रकरणी अनेक लोकांना अटकही करण्यात आली होती. एवढंच नव्हे तर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनीदेखिल या घटनेची निंदा केली होती.