मध्य प्रदेशातील जबलपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी सभा पार पडली. परंतु, या सभेला गालबोट लागलं आहे. कारण, नरेंद्र मोदींच्या रोड शोमध्ये स्टेज कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह चार जण जखमी झाले आहेत. जखमींना व्हिक्टोरिया रुग्णालयात नेण्यात आले, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली. पंतप्रधान मोदींनी रविवारी मध्य प्रदेशातील लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात जबलपूरमध्ये रोड शो करून केली.

मंत्री राकेश सिंह यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. “आजच्या रोड शोमध्ये खूप गर्दी होती आणि स्टेजवर इतके लोक होते की ते खाली पडले. पंतप्रधानांनी मला जमखींची चौकशी करण्यास ताबडतोब जाण्यास सांगितले आणि सर्वांची योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले. मी सर्व जखमींची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. काही जखमी आहेत, त्यांना योग्य उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.”

हेही वाचा >> खरगेंची मानसिकता तुकडे-तुकडे टोळीची! अनुच्छेद ३७०वरून पंतप्रधान मोदींची टीका

जबलपूरचे पोलीस अधिकारी दिलीप श्रीवास्तव म्हणाले, “पंतप्रधान मोदींची रॅली पार पडल्यानंतर गर्दीमुळे शोरूमजवळ बांधलेला स्टेज कोसळला. यामध्ये एक पोलीस कर्मचारी आणि अन्य तीन जण जखमी झाले आहेत. या सर्वांना व्हिक्टोरिया रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

जबलपूरमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो

पंतप्रधान मोदींसोबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह आणि भाजपचे जबलपूर लोकसभा उमेदवार आशिष दुबे होते. रोड शो सायंकाळी साडेसहा वाजता शहीद भगतसिंग क्रॉसिंगपासून सुरू झाला आणि गोरखपूर परिसरातील आदि शंकराचार्य क्रॉसिंग येथे सायंकाळी सव्वासातच्या सुमारास समारोप झाला.

वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, मार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने लोक रांगेत उभे होते. जमाव आपल्या मोबाईलमध्ये नरेंद्र मोदींची छबी टिपण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्यापैकी अनेकांनी ‘मेरा घर मोदी का घर’ आणि ‘मेरा परिवार मोदी का परिवार’ असे संदेश असलेले फलक दाखवले.

या रोड शो मध्ये आदिवासी नृत्यही सादर करण्यात आलं. राज्याच्या बुंदेलखंड प्रदेशातील पारंपरिक नृत्य प्रकार ‘बधाई नृत्य’चाही अविष्कार पाहायला मिळाला. रोड शो गोरखपूरच्या बाजारपेठेतून जात असताना मोदींवर पुष्पवृष्टी करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. जबलपूर हे राज्याच्या महाकोशल प्रदेशात येते, ज्यामध्ये छिंदवाडा देखील समाविष्ट आहे. ही एकमेव लोकसभा जागा जी २०१९ च्या निवडणुकीत भाजपा जिंकू शकली नाही. मध्य प्रदेशातील उर्वरित २८ जागा पक्षाने जिंकल्या.