पंतप्रधान जसिंदा अरदर्न यांच्याकडून जबाबदारीविषयी विचारणा

न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च येथे दोन मशिदींवरील हल्ल्याचे  समाजमाध्यमातून हल्लेखोराने थेट प्रक्षेपण केले याबाबत आता फेसबुक व इतर समाजमाध्यम कंपन्यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंदा अरदर्न यांनी म्हटले आहे. ख्राइस्टचर्च येथे शुक्रवारी मूळ ऑस्ट्रेलियातील असलेल्या एका माथेफिरूने मशिदींमध्ये जाऊन केलेल्या गोळीबारात पन्नास जण ठार झाले होते व त्याने तो हल्ला स्वत:च फेसबुकवर थेट प्रक्षेपित केला होता.

हल्ल्याचे फेसबुकवर थेट प्रक्षेपण करण्यात आल्याबाबत आता  तंत्रज्ञान कंपन्यांनी उत्तरे देणे ही त्यांची जबाबदारी आहे, असे सांगून अरदर्न म्हणाल्या की, फेसुबकच्या मुख्य संचालन अधिकारी शेरील सँडबर्ग यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून न्यूझीलंडमधील हल्ला फेसबुक लाइव्ह करण्यात आल्याचे त्यांनी मान्य केले आहे.

हल्लेखोराने मशिदीवरील हल्ल्याचे भयानक चित्रण फेसबुकवर प्रक्षेपित केले होते नंतर ते काढून टाकण्यात आले. एकूण सतरा मिनिटे हे हल्ल्याचे प्रक्षेपण चालू होते. ते नंतर यु टयूब व ट्विटरवरही टाकले गेले. अनेकदा ते टाकले गेल्याने ते काढून टाकणे हे एक आव्हान बनले होते. ते काढून टाकण्यासाठी आम्ही जे शक्य होते ते केले, काही चित्रण त्यानंतरही फिरत होते. पण इतर समाजमाध्यमांनी ते काढणे ही त्यांची जबाबदारी होती. अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून मिळणे  बाकी आहे, असे अरदर्न यांनी सांगितले.

हे चित्रण काढून टाकण्यासाठी सतत प्रयत्न केल्याचे न्यूझीलंडमधील फेसबुक प्रमुख मिया गार्लिक यांनी म्हटले आहे. पहिल्या चोवीस तासात आम्ही १५ लाख चित्रफिती काढून टाकल्या, १२ लाख चित्रफिती अपलोड होण्यापासून रोखल्या असे कंपनीचे म्हणणे आहे. अरदर्न यांनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासह फेसबुक व इतर कंपन्यांचे सध्याचे नियम पुरेसे नसल्याचे म्हटले आहे.

याबाबत मॉरिसन यांनी सांगितले की, माध्यम कंपन्यांनी सहकार्य केले असले तरी तांत्रिकदृष्टय़ा त्यांची ताकद मर्यादित आहे. एकदा चित्रफीत काढल्यानंतर ती पुन्हा कशी उपलब्ध होते हा प्रश्न आहे. त्यामुळे समाजमाध्यमांना या प्रश्नाचा विचार करावा लागणार आहे. न्यूझिलंडमधील हल्ल्याने हे सर्व प्रश्न ऐरणीवर आले आहेत.