देशभरामध्ये करोनामुळे भितीचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी २२ मार्च रोजी) देशातील नागरिकांना घरातच राहत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केलं आहे. या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र जनता कर्फ्यूच्या एक दिवस आधीच कोलकात्यामधील डमडम मध्यवर्ती कारागृहामध्ये करोनाच्या भितीमुळे चक्क हाणामारी झाली. तुरुंगातील कैद्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केली. संतापलेल्या कैद्याने एका छोट्या कार्यालय वजा चौकीला आग लागवली. कैद्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रूधुरांच्या नळकांड्याचा मारा करावा लागला.

तुरुंगामध्ये झालेल्या या हणामारीमध्ये एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. या हणामारीत १२ हून अधिक कैदी गंभीर जखमी झाल्याचे समजते. तुरुंग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन गटांमध्ये ही हणामारी झाली. करोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंग प्रशासनाने लावलेल्या निर्बंधांवर आणि तपासणीमुळे कैदी वैतागल्याचे तुरुंग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. करोनामुळे लावण्यात आलेल्या प्रतिबंधांमुळे न्यायालयातील खटल्यांची सुनावणी लांबवणीवर पडणार असून त्यामुळे त्यांना कुटुंबियांना भेटता येणार नाही असा कैद्यांचा समज झाला. करोना पसरु नये म्हणून आम्हाला मास्क देण्यात यावे आणि तुरुंगाची अधिक चांगल्या पद्धतीने साफसफाई केली जावी अशी मागणीही कैद्यांनी केली.

डमडम तुरुंगामध्ये सध्या अडीच हजार कैदी आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, करोनामुळे न्यायालय १२ मार्चपासून बंद असल्याने त्यांच्या खटल्यांची सुनावणी लांबल्याने कैदी नाराज आहेत. त्यातच तुरुंग प्रशासनाने कोणताही कैदी २१ मार्चपर्यंत आपल्या नातेवाईकांना भेटू शकत नाही असं सांगितल्याने कैदी अधिक संतापले. यावरुनच कैद्यांनी हणामारी केल्याचे सांगितले जात आहे. न्यायालय बंद असल्याने आपल्याला जामीन मिळणार नाही याबद्दल कैदी आरडाओरड करत होते, अशी माहिती घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने दिली. तर या गोंधळाचा फायदा घेऊन काही कैद्यांनी तुरुंगातून पळ काढण्याचा विचार केला होता असंही पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.