करोना काळात देशभरात अनेक भागांमध्ये शाळा आणि महाविद्यालये ऑनलाईन घेण्यात आली. काही भागात विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील ऑनलाईन झाल्या. तर काही ठिकाणी प्रत्यक्ष म्हणजेच ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. पुद्दुचेरीमध्ये मात्र वेगळंच चित्र दिसत आहे. इयत्ता १ली ते इयत्ता ११वी अशा सर्वच विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षी उत्तीर्ण करण्याच्या प्रस्तावाला पुद्दुचेरीच्या राज्यपालांनी मान्यता दिली आहे. पुद्दुचेरीच्या राज्यपाल तमिलसई सुंदरराजन यांनी पुद्दुचेरी प्रशासनाकडून १ ली ते ९ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला होता. त्यावर आता राज्यपालांच्या मान्यतेची मोहोर उठल्यामुळे पुद्दुचेरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा सुखद धक्काच ठरला आहे.

१०वीचे विद्यार्थीही थेट पास!

Big decision of UGC Ban on admission to open and distance courses
युजीसीचा मोठा निर्णय… मुक्त आणि दूरस्थ अभ्यासक्रमांसाठी प्रवेशबंदी…
Arvind kejriwal
“विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा राजकीय स्वार्थाला प्राधान्य”; दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवालांना फटकारले
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक

काही दिवसांपूर्वी तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी राज्यातील ९वी, १०वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवायच उत्तीर्ण करण्याचा निर्णय जाहीर केला. सहामाही आणि तिमाही परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे त्यांना गुण देऊन पास केलं जाणार आहे. यावेळी १०वीच्या विद्यार्थ्यांना थेट पास करणं चुकीचं ठरेल, अशी टीका देखील करण्यात आली होती. मात्र, आता याच निर्णयाच्या आधारे पुद्दुचेरीमधील १०वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना देखील उत्तीर्ण करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. त्याचसोबत पुद्दुचेरीतील १ली ते ९वीच्या विद्यार्थ्यांना देखील थेट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, या विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत शाळेच्या तासिकांना नियमितपणे हजर राहावे लागणार आहे. ५ दिवसांचा आठवडा आणि शनिवार-रविवार सुट्टी असं या विद्यार्थ्यांचं वेळापत्रक असेल. १ एप्रिलपासून या विद्यार्थ्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतील. १०वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग परीक्षेच्या वेळापत्रकाप्रमाणे भरवले जातील, असं देखील पुद्दुचेरीच्या राज्यपालांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

एकीकडे महाराष्ट्रात परीक्षा घ्याव्यात की नाही? त्या ऑनलाईन असाव्यात की ऑफलाईन? यावर चर्चा सुरू असून सरकारी पातळीवर सर्व घटकांना विचारात घेऊन निर्णय घेतले जात आहेत. तर दुसरीकडे पुद्दुचेरी सरकारने मात्र ११वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना थेट पास करण्याचा निर्णय जाहीर केला आहे! पुद्दुचेरीमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय मतांमध्ये परावर्तित होईल का? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.