चंडिगड : निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या, अन्यथा चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिला आहे.

सिद्धू यांचे सल्लागार मलविंदर माली यांनी राजीनामा दिल्यानंतर काही वेळातच सिद्धू यांनी ही भूमिका घेतली आहे. माली यांनी समाजमाध्यमावरून काश्मीरबाबत वादग्रस्त विधाने केली होती. ती त्यांनी मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर प्रदेश काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी माली यांच्या हकालपट्टीची सूचना केली होती. राष्ट्रीय विषयांवर भाष्य करण्यापेक्षा सिद्धू यांना सल्ला देण्याचे काम माली यांनी करावे, असा टोला मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी लगावला होता. सिद्धू यांच्या विधानाबाबत विचारले असता, ते कोणत्या संदर्भात बोलले ते पाहू असे उत्तर रावत यांनी दिले. पंजाबचे अध्यक्ष आहेत त्यांना अधिकार आहेत, असे रावत यांनी नमूद केले.

 माली यांची गच्छंती

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे सल्लागार मलविंदरसिंग माली यांनी शुक्रवारी राजीनामा दिला आहे. काश्मीरबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर त्यांना पद सोडावे लागले आहे. माली यांनी मात्र  हा राजीनामा नसून सिद्धू यांना सल्ला देण्याच्या भूमिकेपासून बाजूला होत आहोत अशी सारवासारव केली आहे.