भरघोस पैशांचा वापर करून सरकारे पाडणे हे सत्ताधारी पक्षाचे नवे प्रारुप असल्याचे दिसते, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तराखंडमधील राजकीय हालचालींच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप यांच्यावर रविवारी शाब्दिक हल्ला चढवला.
उत्तराखंडमधील राजकीय संकटाच्या मुद्दय़ावर केंद्रातील भाजपला लक्ष्य करण्यासाठी राहुल यांनी ट्विटरची मदत घेतली व नेत्यांच्या या वर्तणुकीशी काँग्रेस लोकशाहीच्या मार्गाने लढा देईल असे म्हणाले. आधी अरुणाचल व आता उत्तराखंडमध्ये झालेला हा लोकशाही व घटनेवरील हल्ला असून मोदीजी व भाजप यांचा हा खरा चेहरा आहे, असे त्यांनी अनेक ट्वीट्समधून सांगितले.
उत्तराखंडमध्ये काँग्रेसच्या ९ आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे हरीश रावत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार संकटात आहे.