लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा १ जून रोजी पार पडतो आहे. तरीही सगळ्या देशाला वेध लागले आहेत ते ४ जूनचे म्हणजेच लोकसभेचा निकाल काय लागणार याचे. भाजपा आणि एनडीएने ४०० पारचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने इंडिया आघाडीसह आम्ही सत्तेत येऊ असं म्हटलं आहे. आज काही वेळापूर्वीच जयराम रमेश यांनी २७२ ही मॅजिक फिगर आहे ती आम्ही गाठू आणि त्यानंतर काही तासांतच आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरेल असं म्हटलं आहे. तर राहुल गांधी यांनीही आता मोदी सत्तेवर येणार नाहीत असं म्हटलं आहे. या सगळ्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं होतं?

“खोट्या दाव्यांचा कारखाना असलेल्या भाजपाने स्वत:ला कितीही दिलासा दिला तरीही काही फरक पडणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात आता INDIA आघाडीचे वादळ वाहतं आहे,” असं राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे.

४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल लागणार आहे. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार की जाणार, यावर शिक्कामोर्तब होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

हे पण वाचा- जयराम रमेश यांचा दावा, “४ जूनला आम्हाला स्पष्ट बहुमत मिळणार आणि पंतप्रधानपदी..”

राहुल गांधींना मुंगेरीलालची स्वप्न पाहुद्या..

राहुल गांधी म्हणतात की ४ जूनला मोदी सरकार घरी जाणार आणि इंडिया आघाडीचं सरकार येणार, याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी लहान असताना मुंगेरीलाल के हसीन सपने ही सीरियल लागायची. त्यात दाखवल्याप्रमाणे मुंगेरीलाल स्वप्नं बघायचा, तशीच स्वप्नं राहुल गांधींना पाहुद्या. ते भारताचे काय अमेरिकेचेही राष्ट्राध्यक्ष होतील अशी स्वप्नं त्यांना पडत असतील. त्यांना खुशाल स्वप्नं पाहुद्या लोकांनी मोदींना निवडलं आहे हे आम्ही पाहतो आहोत.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस वाराणसी दौऱ्यावर

देवेंद्र फडणवीस वाराणसी दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशातल्या सातव्या आणि अंतिम टप्प्याच्या प्रचारासाठी ते पोहचले आहेत. काशी या ठिकाणी काशी-महाराष्ट्र समागम कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील पुणे अपघात आणि मनुस्मृती व जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावरही भाष्य केले. “आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मी काशीत प्रचाराला आलेलो नाही मी लोकांचं प्रेम पाहण्यास आलो आहे असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.