वंचितांना डावलले जात असल्याची टीका; भाजपकडून माफीची मागणी

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जर्मनीतील हॅम्बर्ग येथे भाषणात बेरोजगारीच्या मुद्दय़ाचा संदर्भ आयसिस या दहशतवादी संघटनेशी जोडला. विकासाच्या प्रक्रियेपासून मोठय़ा प्रमाणात लोकांना दूर ठेवले जाते, त्यातूनच मग फुटीरतावादी गट तयार होतात असा जागतिक संदर्भ देत त्यांनी देशात आदिवासी, दलित, अल्पसंख्याकांना दूर ठेवले जाते, त्याचे परिणाम भीषण होतील, असे नमूद केले. दरम्यान, भाजपने राहुल गांधी यांच्या विधानावर टीका केली आहे. राहुल यांनी जे वक्तव्य केले ते मुद्दे गंभीर असल्याने त्यावर स्पष्टीकरण दिले जावे, तसेच देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली आहे.

जर्मनीतील हॅम्बर्गच्या ब्युसेरियस येथे बोलताना राहुल यांनी भाजप सरकारवर टीका केली. बेरोजगारांमध्ये असलेल्या रागामधून झुंडीकडून बेदम मारहाण करून ठार मारण्याचे प्रकार घडत आहेत. त्याचप्रमाणे भाजपने घेतलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयांमुळे लहान उद्योग नष्ट झाले असून त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे, असेही ते म्हणाले.

भारतामध्ये जी राजकीय स्थिती आहे त्यामुळे  बेरोजगारी वाढली आहे. इराकमध्ये जी स्थिती अमेरिकेने निर्माण केली त्यामुळेच आयसिसचा उदय झाला. तशाच प्रकारे भारतामध्ये बेरोजगारी वाढली. अल्पसंख्याकांना, मागासवर्गाला रोजगार मिळाला नाही, सरकार ते देऊ शकले नाही, त्यामुळे आयसिसप्रमाणे दुसरे कोणीतरी उभे राहिले, असा इशारा राहुल यांनी दिला.

राहुल यांनी जर्मनीमध्ये केलेल्या भाषणामध्ये देशाचा अपमान केला आहे आणि त्यासाठी जनता गांधी यांना माफ करणार नाही, गेल्या ७० वर्षांत भारतामध्ये गांधी परिवाराची सत्ता होती, त्या परिवाराने देशाला कोणती दिशा दिली हे तुम्हाला सांगता येईल का, असा सवालही पात्रा यांनी केला.

वक्तव्य चिंताजनक- पात्रा

हॅम्बर्ग येथे राहुल गांधी यांनी केलेले भाषण दिशाभूल करणारे होते, अशी टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. राहुल यांनी दहशतवादाचे समर्थन केले, आयसिसबाबत जे स्पष्टीकरण दिले ते भयानक आणि चिंताजनक आहे, भारतातील राजकीय स्थितीमुळे बेरोजगारी वाढल्याचे उदाहरण गांधी यांनी दिले ते अत्यंत चुकीचे आणि देशाचा अपमान करणारे आहे, असे पात्रा यांनी म्हटले आहे. तुम्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार आहात, तुम्ही काय बोलत आहात याचे तुम्हाला भान नाही, असेही पात्रा म्हणाले.