दीपोत्सवाला आठ दिवसांचा अवकाश असला तरी राजकीय फटाकेबाजीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. त्याचा प्रत्यय शनिवारी आला.
उदयपूर येथील सभेत शनिवारी बोलताना नरेंद्र मोदी यांनी कोळसा खाणवाटप घोटाळ्याबाबत कोणतीही हालचाल करीत नसल्याबद्दल केंद्रीय अन्वेषण विभागावर टीका केली. आपल्या किंवा भाजपच्या कोणाही नेत्याविरुद्ध एक जरी आरोप झाला असता तर सीबीआयने आम्हाला एका मिनिटात कारागृहात डांबले असते, असे ते म्हणाले. यूपीएकडे आता सहा महिनेच राहिले असून पुढील निवडणुकीपूर्वी या सरकारच्या गैरकृत्यांचा पाढा आपण २०० दिवसांत जनतेपुढे वाचणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, मुझफ्फरनगर दंगलीबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत भाजप  निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.
‘शहजादा’ म्हणू नका नाहीतर..
राहुल गांधी यांचा ‘शहजादा’ असा उल्लेख करण्याच्या प्रकाराला काँग्रेसने तीव्र हरकत घेतली आहे. अशा प्रकारच्या असभ्य भाषेला पायबंद घालण्याची काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये क्षमता आहे; परंतु कायदा आणि आचारसंहितेचा सन्मान राखण्यासाठी आम्ही शांत असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी म्हणाले. दुसरीकडे, काँग्रेसने ग्रामीण विकासमंत्री जयराम रमेश यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष प्रचार समितीची स्थापना करून भाजपच्या प्रचाराचा जोरदार मुकाबला करण्याची तयारी सुरू केली आहे.