राहुलबाबा मला इटालियन भाषा येत नाही, अन्यथा आम्ही लोकांना किती दिलंय हे तुम्हाला सांगितले असते, असा टोला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लगावला. मोदी सरकारने राजस्थानमधील जनतेसाठी ११६ योजना आणल्या तरीही भाजपाने काय केले असा प्रश्न काँग्रेसकडून विचारला जातो, असे सांगत अमित शहांनी मोदी सरकारच्या कामाचा पाढाच वाचून दाखवला.

राजस्थानमध्ये शनिवारी अमित शाह आणि मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या उपस्थितीत राजस्थान गौरव यात्रेला सुरुवात झाली. कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शाह यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. राजस्थान गौरव यात्रेला झालेली गर्दी बघून राजस्थानमध्ये पुन्हा कमळच बहरणार आहे हे स्पष्ट झाले, असे शाह यांनी सांगितले.  राहुलबाबा आणि काँग्रेस आमच्याकडून चार वर्षांचा हिशोब मागत आहे. पण या देशातील जनता तुमच्याकडून (काँग्रेसकडून) चार पिढ्यांचा हिशोब मागत आहे, असे प्रत्युत्तर अमित शाह यांनी दिले. मला इटालियन भाषा येत नाही. अन्यथा मी राहुलबाबांना आम्ही जनतेसाठी किती काम केले हे सांगितले असते, असा त्यांनी म्हटले आहे.

राजस्थानमधील वसुंधरा राजे सरकारने कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक वर्गाला जोडण्याचे काम केले. वसुंधरा राजे सरकारने ज्यापद्धतीने काम केले, त्यावरुन राजस्थानमध्ये भाजपा ऐतिहासिक विजय मिळवेल, असे दिसत असल्याचे शाह यांनी सांगितले.

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) यादीवरुन काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे. याचा दाखला देत अमित शाह म्हणाले, राहुल गांधी एनआरसीबाबत त्यांची भूमिका का स्पष्ट करत नाही. त्यांना यातही व्होट बँक दिसत आहे. राहुल गांधी यांना देशात बांगलादेशी घुसखोर हवे की नको, हे तरी त्यांनी सांगावे. काँग्रेसच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांमध्ये जनतेत जाऊन कामाचा हिशोब देण्याचे धाडस नाही. हे धाडस फक्त भाजपाचेच नेते करु शकतात, असे त्यांनी सांगितले.

आम्ही ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल केले. समाजातील मागासवर्गीयांच्या विकासासाठी भाजपा कटीबद्ध आहे, असा दावा शाह यांनी केला.