राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामधील सुवर्णपदक विजेत्या कृष्णा पूनिया, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील १८ मंत्री व २९ आमदारांसह एकूण ६३ उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसने जाहीर केली आहे. १ डिसेंबर रोजी राजस्थान विधानसभेची निवडणूक होणार आहे.
शनिवारी रात्री उशिरा दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस समितीने ही यादी जाहीर केली. गेल्या महिन्यात येथील चुरू येथे झालेल्या राहुल गांधी यांच्या सभेत राष्ट्रकुल स्पर्धेत विजयी ठरलेल्या कृष्णा पूनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सादुलपूर विधानसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढविणार आहेत.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत जोधपूरमधील सरदारपूरा येथून निवडणूक लढविणार असून, मंत्री शांती धारीवाल हे कोटा उत्तर, राजेंद्र पारिक हे सिकरमधून, जितेंद्र सिंग खेत्री विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील.
थानागाजी येथून ऊर्मिला जोगी, किशनगंज येथून माजी आमदार निर्मला सहारिया यांच्या मातोश्री छत्रीबाई सहारिया, महंत निर्मल दास, कोलायत येथून भंवर सिंग भटी अशा काही नव्या चेहऱ्यांनाही काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. बसपाचे सदस्यत्व सोडून गहलोत यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसमध्ये दाखल झालेले  आमदार राजेंद्र सिंग गुडा आणि मुरलीलाल मीणा यांना काँग्रेसने उदयपूरवाटी आणि दौसा या मतदारसंघांतून उमेदवारी दिली आहे. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष दीपेंद्र सिंग शेखावत यांना पुन्हा एकदा श्रीमोधापूर मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली असून, संसदीय सचिव झहिदा खान यांना कामा मतदारसंघ, काँग्रेसचे राजस्थान व्हिप प्रमुख रघु शर्मा यांना केकारी आणि व्हिप उपप्रमुख रतन देवासी यांना राणीवरा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे.
बी. के. शर्मा (हवामहल), ए. ए. खान (तिजारा), अशोक बैरवा (खंडर), महेंद्रजीत सिंग (बागिडोरा), गुरुमित सिंग कुन्नर (करणपूर), विनोद कुमार लीलावती (हनुमानगड), ब्रिजेंद्र सिंग ओला (झुंझुनू), परासदी लाल मीणा (ललासोट), मंजू मेघवाल (जयाल), अमीन खान (शिव), मांगीलाल गरिसा (गोगुंडा), दयाराम परमार (खरैवारा), भरत सिंग (सांगोदे) यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
माजी खासदार विश्वेंद्र सिंग व कर्नल सोनाराम यांना काँग्रेसने अनुक्रमे दीग-कुम्हेर व बायतू या मतदारसंघांतून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी दिली आहे. राजस्थान वित्त आयोगाचे अध्यक्ष बी. डी. कल्ला यांना पुन्हा एकदा बिकनेर पश्चिम येथून उमेदवारी देण्यात आली आहे. ते २००८ साली याच मतदारसंघांतून निवडणुकीत पराभूत झाले होते. राजस्थानचे महसूलमंत्री हेमाराम चौधरी, पर्यटनमंत्री बिना काक, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डॉ. चंद्रभान यांची नावे दुसऱ्या यादीत जाहीर केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पहिल्या यादीत काँग्रेसने संसदेचे सभासद असलेल्या कोणत्याही विद्यमान खासदाराचे नाव जाहीर केलेले नाही. उर्वरित १३७ उमेदवारांची यादी दिवाळीनंतर दिल्लीतून हायकमांडतर्फे जाहीर केली जाणार आहे. अद्याप राजस्थानातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.  २०० जागांच्या राजस्थान विधानसभा निवडणुकीची नामांकने भरण्याची प्रक्रिया ५ नोव्हेंबर रोजी सुरू केली जाणार आहे.