राजस्थानमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जनतेला आकर्षिक करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून वसुंधरा राजे सरकारने गरीब महिला मोबाइल देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडिया मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी ही घोषणा केल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, राजकीय तज्ज्ञांनी मात्र आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मतदारांना आकर्षिक करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

भामाशाह योजनेतंर्गत दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) महिलांना हे मोबाइल फोन देण्यात येणार आहेत. मोबाइल फोनच्या माध्यमातून या महिलांना सरकारच्या आर्थिक आणि इतर योजनांची माहिती पोहोचवली जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. वसुंधरा राजे सरकारचा कार्यकाळ हा २० जानेवारी २०१९ रोजी संपुष्टात येणार आहे. यंदा राजस्थानमध्ये वसुंधरा सरकारबद्दल नाराजी असल्याचे बोलले जाते.

राज्य सरकार ५००० ग्रामपंचायती वायफायने जोडणार आहे. ही योजना १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आली असून ती ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. बाहेरील जगाशी जोडण्यासाठी ही सुविधा देत असल्याचे सरकारने म्हटले आहे. यापूर्वी सरकारने भामाशाह वॉलेट मोबाइलही लाँच केले होते. पैसे हस्तांतरीत करण्यासाठी हे वॉलेट लाँच करण्यात आले आहे.