मध्य प्रदेशमधील इंदूर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सहा वर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. एक आठवड्यापूर्वी झालेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या चुलत भावासह तीन शालेय विद्यार्थ्यांना अटक केली आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक नागेंद्र सिहं यांनी गुरुवारी याची माहिती दिली. सिमरोल ठाणे क्षेत्रातील दतोदा गावात तीन मुलांनी २१ सप्टेंबर रोजी मुलीवर तिच्या घराजवळ बलात्कार केला. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आरोपींनी दिला होता. या धमकीमुळे घाबरलेली पीडित मुलीने काही दिवस कोणालाच याची माहिती दिली नाही. शाररिक वेदना असह्य झाल्यानंतर तिने आपल्या मोठ्या बहिणीला बुधवारी याची सर्व माहिती दिली.

नागेंद्र सिंह म्हणाले, पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर तीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये सहभागी एका मुलाचे वय १२ तर उर्वरित दोघांचे वय हे १५-१५ वर्ष आहे. संशयित आरोपीही आदिवासी समाजाचे आहेत. यातील एक आरोपी हा पीडित मुलीचा चुलत भाऊ आहे. मुलीला इंदूर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचेही सिंह यांनी सांगितले.