गोव्यातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) आपल्या ५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पक्षाची घटनादुरुस्ती केली असून संघटनेतील सक्रिय सदस्यांना अधिक अधिकार बहाल केले आहेत.
पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक शनिवारी येथे पार पडली आणि त्यामध्ये घटनादुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले. सक्रिय राजकीय सदस्यांना कार्यकारी समितीमध्ये आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे, असेही ढवळीकर म्हणाले. पोर्तुगीज राजवटीतून गोवा मुक्त झाल्यानंतर १९६३ मध्ये मगोपची स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर पुढील १८ वर्षे पक्षाचे सरकार राज्यात होते. त्यानंतर काँग्रेस पक्षाने मगोपचा पराभव केला. सध्या मगोप हा राज्यातील सत्तारूढ भाजपचा घटक पक्ष आहे.
पक्षाच्या ब्लॉक समित्या स्थापन करून सर्व म्हणजेच विधानसभेच्या ४० मतदारसंघात पोहोचण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. सर्वात जुना प्रादेशिक पक्ष आता पुनरुज्जीवित होत आहे, असे म्हणता येईल, असेही ढवळीकर म्हणाले. राज्य विधानसभेत मगोपचे तीन आमदार असून पक्ष सिंह या निवडणूक चिन्हावर निवडणुका लढत आहे. पक्षघटना ५० वर्षांपूर्वीची असल्याने ती कालबाह्य़ झाली आहे. पक्षाच्या वाढीचे उद्दीष्ट ठेवून त्यात दुरुस्ती करण्यात आली आहे, असे ढवळीकर म्हणाले.