आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रा यांच्या एका प्रतिक्रियेवर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. राजदूत अखिलेश मिश्रा यांनी एका आयरिश वृत्तपत्राला आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यामध्ये त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केली होती. यावरुन राजदूत हे एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. तसेच अखिलेश मिश्रा यांना त्यांच्या पदावरुन हटविण्याची मागणी काँग्रेसने केली.

एका आयरिश वृत्तपत्रामध्ये भारतीय निवडणुकासंदर्भात एक लेख प्रसिद्ध झाला होता. यावर भारताचे आयर्लंडमधील राजदूत अखिलेश मिश्रा यांनी या वृत्तपत्राला आपली प्रतिक्रिया दिली होती. यामध्ये त्यांनी विरोधकांवर हल्ला केला होता. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे कौतुक केले होते. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

हेही वाचा : “पोस्ट्स हटवतो, पण आदेश अमान्य”, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ‘एक्स’ची भूमिका

जयराम रमेश काय म्हणाले?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी या संदर्भात ‘एक्स’वर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “भारत सरकारचा बचाव करणे ही गोष्ट अपेक्षित आहे. मात्र, अशा प्रकारे विरोधी पक्षांवर हल्ला करणे हे एखाद्या पक्षप्रचारकाप्रमाणे राजदूताकडून अपेक्षित नाही. याचा अर्थ असा होतो की, एखाद्या राजकीय पक्षासाठी काम करणे. विरोधकांवर टीका करणे म्हणजे एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागणे होय. पण एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून हे अपेक्षित नाही”, असे म्हणत जयराम रमेश यांनी आयर्लंडमधील राजदूत अखिलेश मिश्रा यांच्यावर पक्षपाताचा आरोप केला. तसेच त्यांना पदावरून हटवण्याची मागणीही केली.

आयरिश वृत्तपत्रातील लेखात काय लिहिले होते?

एका आयरिश वृत्तपत्रामध्ये भारतीय निवडणुकांवर एक लेख लिहिला होता. या लेखामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीवर आपली पकड मजबूत केली आहे, अशा संदर्भाने लिहिले होते. यानंतर आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रा यांनी यावर प्रतिक्रिया देत पंतप्रधान मोदी यांची देशातील लोकप्रियता अभूतपूर्व असून भारताची लोकशाही मजबूत आहे, असे सांगत विरोधी पक्षावर टीका केली होती.