scorecardresearch

आता रशियाची थेट गुगलला धमकी; “‘ते’ व्हिडीओ काढा नाहीतर…”, फेसबुक आणि टेलिग्रामपाठोपाठ यूट्यूबवरही कारवाई होणार?

फेसबुक आणि टेलिग्रामवर रशियात निर्बंध आणल्यानंतर आता यूट्यूबवर देखील निर्बंध घालण्याची तयारी रशियानं सुरू केली आहे.

russia warns google you tube on ukraine war
युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियानं गुगलला धमकी दिली आहे.

रशियानं २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केल्यापासून आत्तापर्यंत दोन्ही बाजूच्या शेकडो सैनिकांचे बळी गेले आहेत. त्यासोबतच सामान्य नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. या युद्धाचे आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखील परिणाम जाणवू लागल्यानंतर आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील युद्धाचे परिणाम दिसू लागले आहेत. रशियानं देशाविरोधातला मजकूर प्रकाशित केल्याचा निषेध म्हणून याआधीच फेसबुक आणि टेलिग्रामवर रशियामध्ये बंदी घातल्यानंतर आता रशियानं थेट गुगलला बंदीची धमकी दिली आहे.

गुगलतर्फे व्हिडीओ सेवा पुरवण्या येणाऱ्या यूट्यूबवर रशियासंबंधी नकारात्मक संदेश देणारे व्हिडीओ, जाहिराती प्रकाशित होत असून त्या तातडीने काढल्या जाव्यात, अशी मागणी रशियानं केली आहे. तसे न केल्यास रशियाकडून फेसबुक आणि टेलिग्रामप्रमाणेच यूट्यूबवर देखील बंदी घालण्यात येईल अशी माहिती देण्यात येत आहे. स्थानिक माध्यमांनी तर आठवड्याभरात यूट्यूबवर बंदी घातली जाईल, असं देखील म्हटल्याने रशियाच्या या कारवाईची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे.

“गुगलकडून रशियाविरोधी भूमिकेचा हा पुरावा”

“यूट्यूबवर प्रकाशित होणाऱ्या काही जाहिराती, व्हिडीओंमध्ये रशिया आणि बेलारूसमधील रेल्वे संपर्क यंत्रणा उद्ध्वस्त करण्याचं आवाहन केलं जात आहे. अमेरिकी कंपनी असलेल्या गुगलकडून अशा प्रकारे रशियाच्या विरोधी भूमिका घेतली जाण्याचा हा पुरावा आहे”, अशी प्रतिक्रिया रशियातील संबंधित विभागाचे नियंत्रक अधिकारी रॉस्कोम्नॅझॉर यांनी रॉयटर्सशी बोलताना दिली आहे.

रशियाला पाठिंबा दिलात तर गंभीर परिणाम भोगावे लागतील: अमेरिकेचा चीनला इशारा

“यूट्यूब प्रशासनाची कृती ही दहशत निर्माण करणारी आहे. रशियाच्या नागरिकांचं आरोग्य आणि जीविताला धोका निर्माण करणारी आहे. त्यामुळे गुगलनं यूट्यूबवर अशा प्रकारच्या जाहिराती आणि व्हिडीओ तातडीने बंद करावेत”, असं देखील ते म्हणाले.

रशिया स्वत:ची समाजमाध्यमे तयार करणार?

यूट्यूबनं याआधीच रशियन सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांचा मजकूर आपल्या प्लॅटफॉर्म्वरून ब्लॉक केला आहे. तेव्हापासूनच रशियन प्रशासनाकडून यूट्यूबवर राग व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर रशियानं इतर समाजमाध्यमांवर बंदी घालून देशांतर्गत स्वत:चे समाजमाध्यम व्यासपीठ तयार करण्याची देखील तयारी सुरू केल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Russia warns google you tube amid ukraine war adverts playing against pmw

ताज्या बातम्या