पोटनिवडणुकांमध्ये झालेला पराभव अद्यापही पचवू न शकलेल्या भाजपाने आता एक नवा वाद निर्माण केला असून यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील टांडा येथे भाजपा आमदाराने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून भगवे कपडे घातल्याचं समोर आलं आहे. टांडा येथील भाजपा आमदार संजू देवी आणि कार्यकर्त्यांनी थिरुआ परिसरात असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आधी दुधाचा अभिषेक घातला आणि नंतर चंदनाचा टीका लावून भगवे कपडे घालण्यात आले. मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हे करण्यात आल्याचं भाजपा आमदाराने सांगितलं आहे.

आंबेडकरांच्या पुतळ्याला भगवे कपडे घालण्यात आले असल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याआधी उत्तर प्रदेशच्या बदायू येथे अशी घटना घडली होती, ज्यानंतर वाद निर्माण झाला होता. एप्रिल महिन्यात बदायू येथेही बाबासाहेबांच्या पुतळ्याला भगवा रंग देण्यात आला होता. यावर दलितांनी आक्षेप घेत पुतळ्याला पुन्हा निळा रंग दिला होता.

दलित नेत्यांनी घटनेवर नाराजी व्यक्त करत भाजपा सरकार इमारतींना भगवा रंग दिल्यानंतर आता आंबेडकरांच्या पुतळ्यालाही भगवा रंग देत आहे, हे अजिबात स्विकारलं जाऊ शकत नाही असं म्हटलं होतं. जर लवकरात लवकर पुतळ्याला निळा रंग दिला गेला नाही तर जिल्हा प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येईल अशी धमकी देण्यात आली होती. यानंतर तात्काळ पुतळ्याला निळा रंग देण्यात आला.