Wrestler Protest : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नव्या संसदेचे लोकार्पण झाले. जंतर मंतरवर गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी आपला आवाज उंचावण्याकरता नव्या संसद भवनासमोर महापंचायत घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. यावेळी कुस्तीगीर आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. साक्षी मलिक, विनेश फोगाट , बजरंग पुनियासह अनेक आंदोलक खेळाडूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे हे आंदोलन स्थगित होण्याची वेळ आहे. परंतु, साक्षी मलिकने एक ट्विट करून आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आमचं आंदोलन संपलेलं नाही. पोलिसांच्या ताब्यातून सुटून आम्ही पुन्हा जंतर मंतरवर सत्याग्रह सुरू करू. या देशात आता हुकुमशाही चालणार नाही. तर, महिला कुस्तीपटूंचा सत्याग्रह चालेल”, असा ठाम निर्धार साक्षी मलिकने केला आहे.

नेमकं काय घडलं?

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. पण, ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीकरत कुस्तीपटू २३ एप्रिलपासून जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर कुस्तीपटूंनी जंतर-मंतर ते नवे संसद भवन अशा मार्चचं आयोजन केलं होतं. त्यानुसार कुस्तीपटू ११.३० मिनिटांनी नव्या संसद भवनाकडे निघाले होते. पण, त्यापूर्वीच पोलिसांनी कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह अन्य काही जणांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट झाल्याच समोर आलं आहे. बजरंग पुनियानेदेखील ट्वीट करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “एखादं सरकार आपल्या खेळाडूंबरोबर असं वागतं का? आम्ही काय गुन्हा केला आहे,” असं सवाल बजरंग पुनियाने उपस्थित केला आहे.

हेही वाचा >> Video : “अहंकारी राजा…”, कुस्तीपटूंचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र, म्हणाले…

राहुल गांधींची टीका

या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट केला आहे. “राज्याभिषेक पूर्ण झाला. अहंकारी राजा रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे”, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं.

अमोल कोल्हेंचाही संताप

“खेळाडू जेव्हा देशासाठी पदक जिंकतात, अभिमानानं तिरंगा अंगाखांद्यावर घेऊन भावुक होतात, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान उंचावतात; तेव्हा ऊर अभिमानाने भरून येतो आणि कित्येक डोळ्यांत स्वप्नं पेरली जातात..आजचं हे दृश्य मान शरमेनं झुकवणारं..अंतर्मुख व्हायला लावणारं..”, असा संताप राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sakshi maliks determination despite being detained by the police said after escaping sgk