अमेरिकेत लशीच्या बरोबरीने आणखी एका औषधाची मानवी चाचणी थांबवण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मागच्या २४ तासात अमेरिकेत निर्णायक टप्प्यावर असलेल्या दोन औषध चाचण्यांना ब्रेक लागला आहे. करोना व्हायरस विरोधात प्रभावी औषध निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या शास्त्रज्ञांना हा एक झटका आहे. अमेरिकन औषध कंपनी एली लिलीने अँटीबॉडी उपचार चाचणी स्थगित केली आहे. हॉस्पिटलमधील रुग्णांवर एली लिलीकडून तिसऱ्या फेजची अँटीबॉडी उपचार चाचणी सुरु होती. त्याआधी अमेरिकेतील दुसरी मोठी औषध कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने करोना लशीच्या चाचण्या स्थगित केल्या.

जॉन्सन अँड जॉन्सनकडून अमेरिकेत तिसऱ्या फेजची चाचणी सुरु होती. या टप्प्यावर ६० हजार स्वयंसेवकांना सहभागी करुन घेण्यात येईल. लशीचा डोस दिल्यानंतर एका स्वयंसेवकांच्या शरीरावर दुष्परिणाम दिसल्याने जॉन्सन अँड जॉन्सनने चाचणी स्थगित केली. चाचण्या तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. त्याचा कदाचित लशीशी संबंध नसेल, असे जॉन्सन अँड जॉन्सनचे संशोधन प्रमुख माथाई माममेन यांनी गुंतवणूकदारांना सांगितले. एएफपीने हे वृत्त दिले आहे.

मागच्या महिन्यात ब्रिटीश कंपनी अस्त्राझेनेकाने ऑक्सफर्डच्या लशीचा डोस दिल्यानंतर एका स्वयंसेवकाच्या शरीरावर दुष्परिणाम दिसल्यानंतर चाचण्या स्थगित केल्या होत्या. ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचण्या नंतर सर्वत्र सुरु झाल्या. पण अमेरिकेत अजूनही या लशीच्या चाचण्या बंद आहेत. त्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही.

अमेरिका,डेन्मार्क, सिंगापूरसह ५० ठिकाणी एली लिलीने ऑगस्ट महिन्यापासून अँटीबॉडी उपचार चाचण्या सुरु केल्या होत्या. १० हजार रुग्णांवर या चाचण्या करण्याचे उद्दिष्टय आहे. प्रयोगशाळेमध्ये या अँटीबॉडीची निर्मिती करण्यात आली आहे. इमर्जन्सीमध्ये अँटीबॉडी उपचारांना परवानगी मिळावी, यासाठी मागच्या आठवडयात एली लिली आणि रेगेनरॉनने अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे अर्ज केला होता.