तब्बल अठरा दिवस थायलंडमधील एका गुहेत अडकून पडलेल्या फुटबॉल संघाच्या ११ ते १६ वयोगटातील खेळाडूंना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. जगातील ही सर्वात मोठी बचाव मोहिम फत्ते करणे अशक्यप्राय काम होते. त्यासाठी थायलंडच्या नेव्ही सील कमांडोंनी आपले सर्व कौशल्य पणाला लावले होते. दमलेल्या या मुलांना अक्षरशः स्ट्रेचरवर झोपवून बाहेर काढण्यात आले. या मोहिमेचा काही वेळेचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यात हे बाचावाचे कार्य किती अवघड होते याची प्रचिती येते.


थायलंडच्या नेव्ही सीलच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ उपलब्ध असून या बचाव मोहिमेत सहभागी झालेल्या एका माजी नेव्ही सील कमांडोने सांगितले की, या जीवघेण्या मार्गातून मुलांना बाहेर काढण्यासाठी त्यांना स्ट्रेचरवर झोपवून बाहेर काढण्यात आले. या गुहेतून खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकाला सोडवण्यासाठी ही बचाव मोहिम रविवारी सुरु करण्यात आली होती. त्यानंतर तीन दिवसांनंतर ही मोहिम फत्ते झाल्यानंतर याबाबत माहिती उघड करण्यात आली.

याबाबत कमांडर याययंथा म्हणाले, काही मुले झोपली होती तर काही मुले ही खूपच घाबरली होती. दरम्यान, बाहेर काढल्यानंतर येथील थाम लुआंग गुहेमध्ये बचाव पथकांसह उपस्थित डॉक्टर सातत्याने त्या मुलांचा श्वासोच्छवास तपासत होते. तसेच त्यांच्या प्रकृतीवर पूर्ण नजर ठेऊन होते.