महाराष्ट्रातील मतदानाची रणधुमाळी संपल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता माध्यमांच्या वार्तांकनाबद्दल शंका उपस्थित केली आहे. माध्यमे एखाद्या पक्षाच्या नेत्याचे संपूर्ण भाषण ३० ते ३५ मिनिटे दाखवतात. एखाद्या पक्षाच्या नेत्यासाठी वेळ राखून ठेवला जातो आणि हे काम प्रेमाने होत नाही, असे सांगत त्यांनी माध्यमांच्या हेतूंबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 
फेसबुक पेजवरील पोस्टमध्ये शरद पवार म्हणतात, आतापर्यंत माध्यमं वास्तवचित्र दाखवण्याचा प्रयत्न करत होती. आता तसं वाटत नाही. यापूर्वी एखाद्या नेत्याच्या भाषणाचा ठराविक भाग टीव्हीवर दाखवला जायचा. पण आता एखाद्या पक्षाच्या नेत्याचं संपूर्ण भाषण अनेक भाषांच्या चॅनल्सवर ३०-३५ मिनिटं दाखवलं जातंय. एवढा उदारापणा मीडियाने याआधी कुठल्याही राजकीय पक्षाला दाखवल्याचं मला आठवत नाही. काळजी ही आहे की, वेळ राखला जातोय आणि वेळ राखून ठेवायचं काम प्रेमाने होतं, असं मला वाटत नाही.