भाजप नेते खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्ष नेतृत्वावर उपहासात्मक शब्दांत टीका केली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोदी आणि शहा यांच्यावर निशाणा साधला. सर्व ट्रिक्स, खोटी वक्तव्ये आणि लांबलचक आश्वासनं संपली असतील तर, ‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने गुजरात सोडून दिल्लीला परत यावं, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले. त्यांचा स्पष्ट रोख मोदी आणि शहा जोडगळीकडे होता.

सिन्हा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले, ‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ला माझी विनंती आहे की, जर सर्व ट्रिक्स, खोटी वक्तव्ये आणि लांबलचक आश्वासनं संपली असतील तर कृपया दिल्लीला परत या. जे श्रेय घेण्यासाठी भांडत आहेत, असे सर्व मंत्री, मंत्रालय, गुजरातमध्ये बसलेल्या सरकारनेही आता परतायला हवं,

इतक्यावरच न थांबता सिन्हा पुढे म्हणाले की, ‘जर आपण विजयी झालो तर आम्हाला माहीत आहे की, याचे सर्व श्रेय तुम्हाला मिळेल. पण जर पराभव झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? एक जुनी म्हण आहे, ‘टाळी कर्णधाराला तर शिवीही कर्णधारालाच’. मी देवाकडे प्रार्थना करतो आणि मला अपेक्षाही आहे की, गुजरात निवडणुकीत आम्हाला टाळीच मिळो. जय हिंद.’ पक्षाकडून दुर्लक्षित असलेले शत्रुघ्न सिन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्ष नेतृत्वावर वारंवार सवाल उपस्थित करताना दिसतात. बिहारमधील पाटणासाहिब मतदारसंघातून ते लोकसभेवर गेले आहेत.

गुजरात विधानसभा निवडणूक ही मोदी व शहा यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ते सातत्याने गुजरातच्या दौऱ्यावर असल्याचे दिसून आले. दरम्यान, राहुल गांधी यांचा आक्रमक प्रचार, जीएसटी आणि नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून झाला. त्यामुळे यंदा भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. अंतिम टप्प्यातील प्रचार मंगळवारी संपुष्टात आला तर आज (गुरूवार) ९३ मतदारसंघात मतदान होत आहे. येत्या १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून १९९५ पासून गुजरातमध्ये भाजप सरकारची सत्ता आहे.