‘पीपली लाइव्ह’ या सिनेमाचे सह दिग्दर्शक महमूद फारुकी यांना बलात्कार प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळाला आहे. परस्परात नातेसंबंध असलेल्या एखाद्या जोडप्यातील महिलेने बलात्काराचा आरोप केला तर त्यावर निर्णय देणे कठीण असते. या प्रकरणात हायकोर्टाने दिलेला निर्णय योग्य आहे त्यामुळे तोच निर्णय आम्ही कायम ठेवतो आहोत असे सुप्रीम कोर्टाने मह्टले आहे. या संपूर्ण प्रकरणात बळजबरी झाल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. तसेच कोर्टाने बलात्कार पीडितेच्या इमेलचा हवाला देत पीडित मुलीच्या वकिलांनाही प्रश्न विचारला की, ‘बलात्कार झालेली पीडिता आय लव्ह यू कसे म्हणेल?’ बलात्काराची अशी किती प्रकरणे तुम्ही पाहिली आहेत? असेही सुप्रीम कोर्टाने विचारले आहे.

महमूद फारूकीच्या विरोधात बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. या प्रकरणातला निर्णय योग्यच आहे त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. अॅड. वृंदा ग्रोव्हर आणि अनिंदिता पुजारी यांनी पीडितेची बाजू मांडली. पीडित महिला आणि महमूद हे फक्त एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात कोणतेही संबंध प्रस्थापित झाले नव्हते. त्याचमुळे या प्रकरणात आरोपीला ७ वर्षांची शिक्षा ट्रायल कोर्टाने सुनावली आहे असेही यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले. ‘आजतक’ या वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

सुप्रीम कोर्टाने मात्र पीडित महिलेच्या वकिलांना खडसावले, या दोघांमध्ये जे इमेल एकमेकांना पाठवले गेले आहेत त्यावरून हे दोघेही चांगले मित्र होते असे दिसून येते आहे. तसेच बलात्काराची तुम्ही इतर प्रकरणेही हाताळली असतील त्यामध्ये किती पीडिता आय लव्ह यू म्हणाल्या आहेत हे तुम्हीच सांगा, असे म्हणत कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टानेही याचिका फेटाळल्यामुळे महमूद यांना दिलासा मिळाला आहे.

२०१५ मध्ये महमूद फारूखी यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार पीडित महिलेने नोंदवली होती. ३५ वर्षीय महिलेने दिल्लीच्या न्यू डिफेन्स कॉलनी पोलीस ठाण्यात ही तक्रार केली होती. सुखदेव विहार या ठिकाणी असलेल्या एका घरात फारूखीने बलात्कार केला असे या महिलेने तक्रारीत म्हटले होते. मात्र या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आता फारुखी यांना दिलासा दिला आहे.