तहलकाचे संस्थापक संपादक तरूण तेजपाल यांना सहकारी महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर आता त्यांच्या आणखी वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. गोवा पोलिसांकडून तहलका नियतकालिकाच्या संपादक शोमा चौधरी यांना दंडाधिकाऱ्यांपुढे निवेदन नोंदवण्यासाठी बोलावले जाणार आहे. दरम्यान, तेजपाल यांना न्याय दिला जाईल याचा अर्थ त्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले जाईल असे सांगून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी सांगितले की, तेजपाल यांच्याविरोधात एक ते दीड महिन्यात आरोपपत्र दाखल केले जाईल.
तेजपाल यांना लैंगिक हल्ला, कनिष्ठ महिला सहकाऱ्यावर बलात्कार या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्या सोमवारी लैंगिक चाचण्या करण्यात आल्या होत्या. गोवा पोलीस शोमा चौधरीसह आणखी तीन साक्षीदारांना बोलावणार असून, तक्रारदार महिला पत्रकाराने तिच्याशी करण्यात आलेल्या दुर्वर्तनाची वाच्यता प्रथम या चौघांशी केली होती. पंचतारांकित हॉटेलमध्ये तेजपाल यांनी दोनदा या महिलेशी लैंगिक गैरवर्तन केले होते. चौधरी व इतर तिघांना जबाबासाठी बोलावण्याकरिता आम्ही न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे, असे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, गोवा पोलिसांनी दिल्ली येथे चौधरी यांचे म्हणणे नोंदवून घेतले आहे. त्या या नियतकालिकाच्या व्यवस्थापकीय संपादक आहेत. या घटनेबाबत  चौधरी यांना प्रथम या महिला पत्रकाराने माहिती दिली होती, त्यामुळे त्यांचे जाबजबाब गरजेचे आहेत. भा.दं.वि १६४ अन्वये न्याय दंडाधिकाऱ्यापुढे दिलेली कुठलीही कबुली ही पुरावा म्हणून ग्राह्य़ धरली जाते. न्यायालयाने तारखा दिल्यानंतर या चौघांना बोलावले जाईल असे पोलिसांनी सांगितले.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होईल आणि संबंधितांना योग्य न्याय मिळेल,असा विश्वास व्यक्त केला. तसेच या प्रकरणी पोलीस महिना-दीड महिन्यात आरोपपत्र दाखल करतील असे सांगत या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाची शक्यताही पर्रिकर यांनी फेटाळून लावली.
तेजपालची दुसऱ्यांदा तपासणी
तेजपाल यांची बुधवारी सकाळी दुसऱ्यांदा वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या आठवडय़ात अटक झाल्यानंतर तेजपाल यांना २ डिसेंबर रोजी गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात विविध वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी नेले होते. त्यावेळी त्यांची पौरुषत्व चाचणीही करण्यात आली होती आणि ती सकारात्मक आली होती. तेजपाल यांना लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे तपासाचा एक भाग म्हणून त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
तेजपालला पंखा नाहीच
महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खात असलेल्या तेजपाल यांना कोठडीत पंखा पुरविण्याची मागणी गोवा न्यायालयाने बुधवारी फेटळली. तेजपाल यांना सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.   मात्र २ डिसेंबर रोजी तेजपाल यांनी आपल्या वकिलांमार्फत कोठडीत पंखा पुरविण्यात यावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. हा अर्ज प्रथम वर्ग न्या. क्षमा जोशी यांच्यासमोर आज बुधवारी आला होता. मात्र न्यायालयाने तेजपाल यांचा अर्ज फेटाळून लावला.
 तेजपाल यांची वैद्यकीय चाचणी सकारात्मक
 अग्रलेख- करुण निस्तेजपाल