पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हिंदू प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात येणार आहे. यासाठी सिंध प्रांताकडून ४०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मंदिरे, चर्च, गुरुद्वारा यांच्या सुरक्षेसाठी ही रक्कम खर्च केली जाणार आहे.

सिंध प्रांतात असणारी प्रार्थनास्थळे आणि त्यांच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची खरेदी केली जाणार आहे. ‘द डॉन’ या वृत्तपत्राने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

‘या विशेष प्रयत्नांमुळे मंदिरांच्या सुरक्षेत वाढ होईल,’ असा विश्वास सिंध प्रांतांच्या मुख्यमंत्र्यांचे विशेष सहाय्यक खाटुमल जीवन यांनी व्यक्त केला आहे. या नव्या प्रकल्पांतर्गात प्रार्थनास्थळ आणि त्यांच्या परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. संवेदनशील प्रार्थनास्थळांमध्ये अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावून तेथील सुरक्षा वाढवण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जाणार आहे, असे ‘द डॉन’ने म्हटले आहे.

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो-झरदारी यांच्या सूचनेवरुन हा प्रकल्प राबवला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. पाकिस्तानमधील हैद्राबाद, लरकाना आणि इतर भागांमधील हिंदू प्रार्थनास्थळांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सिंध पोलिसांनी त्यांच्या अखत्यारित अल्पसंख्यांकांची १,२५३ प्रार्थनास्थळे असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये हिंदू, ख्रिश्चन, शिख धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांचा समावेश आहे. सिंध प्रांतात ७०३ मंदिरे, ५२३ चर्च आणि ६ गुरुद्वारे आहेत. याशिवाय अहमदी पंथांची २१ प्रार्थनास्थळे सिंध प्रांतात आहेत. या प्रार्थनास्थळांच्या सुरक्षेसाठी २,३१० पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.