दक्षिण आशियामधील दहशतवादाला केवळ एका देशामुळे खतपाणी मिळत असल्याचे भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला टोला लगावला. दहशतवाद हा दहशतवाद असतो, या वाक्याचा पुनरुच्चार करत दहशतवादाला पोसणाऱ्यांवर सर्वांनी एकत्र येऊन कारवाई करण्याची गरज असल्याचे आवाहन मोदींनी जी-२० परिषदेत आंतरराष्ट्रीय नेत्यांसमोर सोमवारी केले. मोदींनी यावेळी पाकिस्तानचे नाव घेतले नसले तरी त्यांचा बोलण्याचा रोख हा पाकिस्तानकडे होता. शून्य दहशतवाद हेच भारताचे धोरण आहे. त्यापेक्षा कमीची अपेक्षा करून या धोक्याला रोखता येणार नाही, असेही यावेळी मोदींनी स्पष्ट केले. क्षी जिनपिंग यांच्याबरोबर मोदी यांची जी २० बैठकीच्या अगोदर भेट झाली होती. यावेळी मोदी यांनी चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका पाकव्याप्त काश्मीरमधून नेली जात असल्याबाबत चिंता व्यक्त केली होती. पाकव्याप्त काश्मीरमधून, पाकमधून दहशतवादी सीमारेषा ओलांडत असल्यामुळे चीन-पाक महामार्गाचा मुद्दा संवेदनशील असल्याचे मोदींनी म्हटले होते. हाँगझोऊमध्ये सुरु असलेल्या जी-२० परिषदेच्या पहिल्या दिवशी देखील पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा केली होती. जी-२० परिषदेमध्ये अर्जेंटिना, आस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण अफ्रीका, दक्षिण कोरिया, तुर्कस्तान, इंग्लड, अमेरिका आणि युरोपीय संघांचा समावेश आहे.