केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कन्येचे गोव्यात अवैध मद्यालय असल्याचा आरोप प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने शनिवारी केला. या आरोपानंतर आता स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेष, नीता डिसुजा यांच्यासह काँग्रेसला नोटीस बजावली आहे. माझ्या मुलीविरोधात खोटा आरोप केला जात असून लिखित स्वरुपात माफी मागावी. तसेच सर्व आरोप परत घ्यावेत, अशी मागणी या नोटिशीत करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> केरळनंतर आता दिल्लीत आढळला मंकीपॉक्सचा रुग्ण; भारतात चार रुग्णांची नोंद

“आपण सर्वांकडून आमच्या अशिलाची तसेच कुटुंबाच्या प्रतिष्ठेची बदनामी केली जात आहे. आमच्या अशिलाच्या मुलीने कोणताही बार सुरु करण्यासाठी तसेच कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी अर्ज केलेला नाही. तसेच गोव्यातील उत्पादन शुल्क विभागाकडूनही इराणी यांच्या मुलीला कोणतीही नोटीस आलेली नाही,” असे या नोटिशीत म्हणण्यात आले आहे.

स्मृती इराणी यांच्या मुलीवर कोणते आरोप करण्यात आले?

“केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. गोव्यात इराणी यांच्या कन्येद्वारे चालवल्या जाणाऱ्या उपाहारगृहात मद्यसेवा देण्यासाठी नकली परवाना दिला गेल्याचा आरोप आहे. ही माहिती ‘सूत्रांवर’ विसंबून दिली गेलेली नाही. कुठल्याही संस्थेने अथवा राजकीय सूडबुद्धीने प्रेरित होऊन आम्ही हा आरोप केलेला नाही. तर माहितीच्या अधिकारातून उघड झालेल्या माहितीद्वारे तसे स्पष्ट झाले आहे. ‘सिली सोल्स कॅफे अँड बार’साठी इराणी यांच्या कन्येने खोटी कागदपत्रे देऊन मद्यालय परवाना मिळवल्याचे या माहितीद्वारे स्पष्ट होते,” असा दावा खेरा यांनी केलेला आहे.

हेही वाचा >>> दिल्लीत ‘आप’च्या कार्यक्रमात पोलिसांनी जबदरस्ती लावला पंतप्रधानांचा फोटो; मंत्री गापोळ राय यांचा आरोप

“२२ जून २०२२ रोजी परवाना नूतनीकरणासाठी ज्या ‘अँथनी डीगामा’ यांच्या नावाने अर्ज केला गेला, त्या व्यक्तीचे मागील वर्षीच निधन झाले आहे. अँथनींच्या आधारकार्डानुसार ते मुंबईच्या विलेपार्लेचे रहिवासी असल्याचे समजते. माहितीच्या अधिकाराद्वारे ही माहिती मिळवणाऱ्या वकिलांना अँथनींचे मृत्यू प्रमाणपत्रही मिळाले आहे. या कागदपत्रांद्वारे असे निदर्शनास येते, की या मद्यालय परवान्यासाठी आवश्यक उपाहारगृहाच्या परवान्याशिवायच मद्यालय परवाना देण्यात आला. पंतप्रधानांनी स्मृती इराणी यांना मंत्रीपदावरून हटवावे,” अशी मागणी खेरा यांनी केली.