देशातील असहिष्णूतेच्या मुदयावरून आमिरने केलेले वक्तव्य त्याला अतिशय महागात पडले असून इतर ब्रँड्ससह आता त्याला ‘स्नॅपडील’चे सदिच्छादूत पद गमवावे लागले आहे. स्नॅपडील कंपनीने त्याचे कॉन्ट्रॅक्ट वाढवून न देण्याचा निर्णय घेतला आहे.याआधी आमीर खानला अतुल्य भारत योजनेच्या सदिच्छादून पदावरुन दूर करण्यात आले होते.
ऑनलाईन शॉपिंग साइट स्नॅपडीलचा सदिच्छादूत म्हणून असलेला आमीरचा करार या महिन्यात संपत आहे. स्नॅपडीलच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा करार एक वर्षासाठी वाढवण्यात येणार होता. परंतू आमीर खानच्या असहिष्णुतेवरील वक्तव्यावरुन आमीरविरुद्ध वातावरन बघता स्नॅपडीलने कराराचे नुतनीकरन न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र असे असले तरी कंपनी आता खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने आमीरऐवजी दुस-या कोणत्याच सेलिब्रिटीला सदिच्छादूत नेमणार नाही. तर सध्या असलेल्या ग्राहकांनाच टिकवणे, नवनवीन कॅटग्री लाँच करणे आणि वेगेवगळ्या योजनांद्वारे ग्राहकांना खरेदीस उद्युक्त करणे, यावर त्यांचा भर असेल. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात असहिष्णूतेच्या मुद्यावरून आमिरने केलेल्या वक्तव्यामुळेच कंपनीने हा निर्णय घेतल्याचे समजते.
गेल्या अनेक दिवसापासून आमीर खानने असहिष्णू वातावरणबाबत केलेल्या वक्तव्याचा फटका स्नॅपडीलला बसत होता. अभिनेता आमीर खान हा स्नॅपडीलचा सदिच्छादूत असल्याने अनेकांनी स्नॅपडीलचे अ‍ॅप डिलिट करुन त्याने केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत होते. नेटिझन्सनी आमीरसोबतच कंपनीचाही निषेध नोंदवण्यात आला होता.