भारतीय हवाई दलात नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या राफेल विमाने चालवणाऱ्या वैमानिकांच्या चमूत एका महिलेचा समावेश करण्यात येणार आहे. गोल्डन अ‍ॅरो स्क्वार्डनच्या वैमानिक चमूत समावेश करण्यात आलेल्या या वैमानिक महिलेस सध्या प्रशिक्षण दिले जात आहे. तिने यापूर्वी मिग २१ विमाने चालवली असून राफेल विमाने चालवणाऱ्या चमूत तिची निवड करण्यात आली आहे.

भारतीय  हवाई दलातील दहा महिला वैमानिकांनी सुखोई, मिग २९ यासह सर्व प्रकारची लढाऊ जेट विमाने चालवली आहेत. फ्लाइट लेफ्टनंट मोहना सिंग या पहिल्या लढाऊ वैमानिक आहेत. त्यानंतर त्यात फ्लाइट लेफ्टनंट अवनी चतुर्वेदी, फ्लाइट लेफ्टनंट भावना कांत यांचाही समावेश झाला.

भारतीय हवाई दलात १० महिला लढाऊ वैमानिक  असून १८ दिशादर्शक (नॅव्हिगेशन) वैमानिक आहेत. एकूण भारतीय हवाई दलात १८७५ महिला अधिकारी आहेत. गेल्या आठवडयात संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी संसदेत सांगितले,की महिला लढाऊ वैमानिकांना भारतीय हवाई दलात महत्त्वाच्या संधी दिल्या जात आहेत. १० सप्टेंबरला गोल्डन अ‍ॅरो स्क्वार्डनची स्थापना भारतीय हवाई दलात करण्यात आली असून यापूर्वी १ ऑक्टोबर १९५१ मध्ये अंबाला येथील हवाई दल तळावर ते कार्यान्वित केले होते, आता त्याचे  पुनरूज्जीवन करण्यात आले आहे. या स्क्वार्डनमध्ये १९५५ मध्ये द हॅलिलँड  व्हॅम्पायर लढाऊ विमानांचा समावेश होता. आता फ्रेंच बनावटीची पाच बहुउद्देशी राफेल विमाने १० सप्टेंबरला अंबाला हवाई तळावरील कार्यक्रमात  हवाई दलात समाविष्ट करण्यात आली.  भारताला एकूण १० राफेल विमाने दिली असून त्यातील पाच वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी फ्रान्समध्ये आहेत. राफेल विमानांचा पुढचा टप्पा नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे. २०२१ अखेरीस सर्व विमाने भारताला मिळतील.  रशियाच्या सुखोई जेट विमानानंतर २३ वर्षांनी लढाऊ जेट विमाने भारताने घेतली आहेत.  त्यातील पहिली पाच विमाने २९ जुलैला भारतात आली. भारत व फ्रान्स यांच्यात चार वर्षांपूर्वी ३६ राफेल विमानांच्या खरेदीचा करार झाला होता. या विमानांची किंमत ५९ हजार कोटी रुपये आहे.