शैक्षणिक पात्रतेवरून टीकेच्या धनी झालेल्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी पुन्हा एकदा नव्या वादामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. स्मृती इराणी यांच्या ‘लेटरहेड’मध्ये व्याकरणाच्या चुका आढळून आल्या आहेत. सीबीएससी परिक्षेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल इराणी यांनी शिक्षकांच्या कामाचे कौतुक करीत देशातील शिक्षकांना पत्र लिहीले. मात्र, पत्राच्या ‘लेडरहेड’मध्ये ‘मनिस्टर’ या शब्दाचे इंग्रजी स्पेलिंग चुकीचे लिहीण्यात आले आहे. तसेच ‘संसाधन’ हा हिंदी शब्द ‘संसाधान’ असा लिहिण्यात आला आहे. शैक्षणिक पात्रतेवरून याआधीच स्मृती इराणींवर टीकेची झोड उठविण्यात आली होती. आता ‘लेटरहेड’मधील चुकांची संधी साधून सोशल मीडियामध्ये इराणी यांची खिल्ली उडवली जात आहे. इराणी यांनी पाठविलेल्या पत्राच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, स्वत:च नाव हिंदीत लिहिताना माझ्याकडून कधीच चूक होणार नाही. आपल्या विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांना या चुकीचे स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत, असे स्मृती इराणी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर स्पष्ट केले आहे.