जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात बेपत्ता झालेला विशेष पोलीस अधिकारी इरफान अहमद दार दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाला आहे. अधिकाऱ्याकडे एके-४७ असल्याने या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं जात होतं. पोलीस अधिकाऱ्याच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं होतं. मात्र आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, इरफान अहमद दार हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाला आहे.

इरफान अहमद दार पम्पोर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. मंगळवारपासून तो बेपत्ता झाला होता. पुलवामाच्या लुलीपोरा नेवाजवळ त्याचं शेवटचं लोकेशन होतं. तो दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली होती. हिज्बुलच्या प्रवक्त्याने एका स्थानिक वृत्तवाहिनीला फोन करुन अधिकारी संघटनेत सामील झाला असल्याचा दावा केला.

विशेष पोलीस अधिकाऱ्यांना एका ठराविक पगारावर नियुक्त करण्यात आलेलं असतं. त्यांना कोणत्याही प्रकारचं शस्त्र चालवण्याचं किंवा ते हाताळण्याचं प्रशिक्षण देण्यात आलेलं नसतं. याशिवाय त्यांना सर्व्हिस रायफल बाळगण्याचीही परवानगी नाही.