बलात्काराच्या खटल्यातील आरोपी धरमपाल याने पॅरोलवर सुटल्यावर पीडित युवती आणि तिच्या कुटुंबातील चौघांची हत्या केली त्याबद्दल त्याला सुनाविण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेला पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने ६ मेपर्यंत स्थगिती दिली आहे.
धरमपालला देण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप द्यावी, अशी याचिका करण्यात आली होती. न्या. ए. के. मित्तल आणि न्या. जी. एस. संधावालिया यांनी त्याला ६ मेपर्यंत स्थगिती दिली. धरमपाल याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी फेटाळला. त्यानंतर त्याला १५ एप्रिल रोजी फाशी देण्यासाठी रोहटक कारागृहातून अंबाला येथे आणण्यात आले होते.
दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यास विलंब लागल्याच्या कारणास्तव त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेच्या शिक्षेत रूपांतरित करावी, अशी याचिका आरोपीच्या वतीने करण्यात आली होती. या निर्णयामुळे फाशीच्या गुन्हेगारांच्या फाशी अंमलबजावणीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.