माझ्या विजयानंतर मुस्लीम, आफ्रिकन अमेरिकी, लॅटिनो लोकांचा छळ झाल्याच्या बातम्या आल्या आहेत, या गोष्टी दुर्दैवी असून या सर्वाचा छळ ताबडतोब थांबवण्यात यावा, असे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. छळाच्या बातम्या वाचून वाईट वाटले, हे आता ताबडतोब थांबवा, कॅमेऱ्यासमोवर येऊन मी हे सांगत आहे, असे त्यांनी सीबीएस वाहिनीच्या ‘सिक्स्टी मिनिट’ या कार्यक्रमात सांगितले.

निवडणूक निकालानंतर मुस्लीम, हिस्पॅनिक, अमेरिकन, कृष्णवर्णीय यांच्या विरोधात द्वेषमूलक गुन्हे झाले, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे असे विचारले असता ट्रम्प म्हणाले, की असे करू नका हेच माझे सांगणे आहे, ते भयानक आहे. देशाला मी एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत असताना हे असे चालणार नाही.

समाजातील काही लोक मला घाबरलेले दिसतात पण त्यांना माझी माहिती नाही, मी त्यांना सांगतो मला अजिबात घाबरू नका. हे गुन्हे का घडत असावेत, असे विचारले असता त्यांनी सांगितले, की काही प्रकरणात ते व्यावसायिक निदर्शक असावेत, विकीलिक्समध्ये त्याचे संदर्भ आले आहेत.

कुणी घाबरू नका. आपण देश पुन्हा प्रगतिपथावर नेणार आहोत, आपली निवडणूक झाली आहे तुम्हाला अजून पुरेसा वेळ देता आलेला नाही, लोक निदर्शने करीत आहेत. हिलरी निवडून आल्या असत्या व माझ्या लोकांनी निदर्शने केली असती, तरी प्रत्येकाने ही किती भयानक गोष्ट आहे असेच म्हटले असते, त्यामुळे काही प्रकरणात दुटप्पीपणाचा दृष्टिकोन अवलंबला जात आहे, असे मला वाटते असे ते म्हणाले.