पंतप्रधान नरेंद्र मोदी महाशिवरात्रीनिमित्त कोईम्बतूरमध्ये ११२ फूटांच्या शिवप्रतिमेचे अनावरण करणार आहेत. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन तासांसाठी कोईम्बतूरमध्ये असणार आहेत. पंतप्रधान मोदी ईशा योग केंद्रात शिव प्रतिमेचे अनावरण करणार आहेत. मोदींच्या कोईम्बतूर दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी शिव प्रतिमेच्या अनावरणासाठी ईशा योग केंद्रात जाणार आहेत. त्यामुळे ईशा योग केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांची धरपकड सुरू आहे. बुधवारी संध्याकाळपासूनच कुत्र्यांची धरपकड करणारे पथक कामाला लागले आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी कुत्र्यांना पकडून त्यांना पालिकेने कुत्र्यांसाठी उभारण्यात आलेल्या निवाऱ्यात ठेवण्यात येते आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरुन कुत्र्यांची धरपकड केली जाते आहे. विमानतळाजवळील रस्त्ता आणि आसपासच्या परिसरातील कुत्र्यांना ताब्यात घेतले जाते आहे. या कुत्र्यांना तीन ते चार दिवस पालिकेच्या निवाऱ्यात ठेवण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन देशवासीयांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाशिवरात्रीच्या पवित्र दिवसाच्या देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा,’ असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे. ईशा फाऊंडेशन २५ कोईम्बतूरपासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी शहरात आणि तमिळनाडू-केरळ सीमेवर पाचस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. कोईम्बतूर हे ठिकाण पश्चिम घाट परिसरात येते. केरळच्या पर्वतरांगा या ठिकाणापासून जळ आहेत. ‘राज्याच्या सीमेवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्याच्या सीमेवरुन नक्षलवादी घुसखोरी करु नये, म्हणून सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मानवाधिकार संस्था, अनेक राजकीय पक्ष, शेतकरी आणि सामाजिक संस्था यांचा विरोध लक्षात घेता पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याआधी सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष पुरवण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी ज्या शिव प्रतिमेचे अनावरण करणार आहेत, त्या प्रतिमेचा चेहरा अतिक्रमण केलेल्या जमिनीवर तयार करण्यात आल्याने याबद्दल विरोध करण्यात आला होता. या प्रतिमेवरुन माकप आणि भाकपकडून अनेक आरोप करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांनी कोईम्बतूरचा दौरा करु नये, असेदेखील माकप आणि भाकपने म्हटले आहे.