साठेबाजांवर कारवाईचा केंद्र सरकारचा इशारा; दुष्काळाने उत्पादनावर परिणाम
कागदोपत्री महागाई कमी होत असल्याचा दावा केला जात असताना आता डाळींबरोबर साखरेचीही दरवाढ झाली आहे. साखरेचे दर किलोला ४० रुपयांच्या पुढे गेले असून केंद्राने राज्य सरकारांना साखर व्यापाऱ्यांकडील साठा मर्यादा कमी करण्यास सांगितले आहे. व्यापाऱ्यांनी साखरेची साठेबाजी करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असे सरकारने म्हटले आहे.
अन्नमंत्री रामविलास पास्वान यांनी सांगितले, की साखरेचे दर वाढत आहेत, त्यामुळे आम्ही राज्य सरकारांना व्यापाऱ्यांच्या साखर साठय़ाची मर्यादा कमी करण्यास सांगितले आहे. साखरेचे भाव ऑक्टोबर २०१५ मध्येही वाढले होते कारण साखरेचे उत्पादन २८.३ दशलक्ष टन अपेक्षित असताना ते २५.६ दशलक्ष टन झाले होते. साखरेचे भाव या महिन्यात चाळीस रुपयांच्या वर गेले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दर ३० रु. किलो होते. आता सरकारी आकडेवारीनुसार साखर ४४ रुपये किलो झाली आहे. साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता व सरकारने २०११-१६ या वर्षांत ३.२ दशलक्ष टनांच्या निर्यातीचे दिलेले आदेश यामुळे साखरेचे दर वाढत आहेत. साखर कारखान्यांनी १३ लाख टन साखर निर्यात केली असून सप्टेंबपर्यंत सात लाख टन साखर आणखी निर्यात केली जाणार आहे. साखरेचे उत्पादन एप्रिल २०१५ मध्ये ८ टक्क्य़ांनी घटून ते २४.३ दशलक्ष टन झाले होते.
महाराष्ट्रातील दुष्काळाचा फटका
२०१६ मध्ये साखरेचे देशांतर्गत उत्पादन कमी होणार असून साखरेचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात दुष्काळी स्थितीमुळे देशपातळीवरील साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या दहा टक्के कमी होऊन ते २५.५ दशलक्ष मेट्रिक टन इतके असेल, असा अंदाज आयसीआरएने दिला आहे.