निर्भया बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने चार दोषींची शिक्षा कायम ठेवली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने २०१४ मध्ये दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी निकाल देताच न्यायालयात उपस्थित असलेल्या निर्भयाच्या आईने टाळ्या वाजवून निकालाचे स्वागत केले. ‘एकट्या माझ्या मुलीलाच नव्हे, तर या निकालामुळे संपूर्ण देशाला न्याय मिळाला आहे,’ अशी प्रतिक्रिया निर्भयाची आई आशा देवी यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने निर्भया प्रकरणातील दोषींची फाशी कायम ठेवल्याबद्दल निर्भयाच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. ‘या प्रकरणात निकाल येण्यास उशीर झाला असला, तरी आमच्या मुलीला न्याय मिळाला आहे,’ अशी प्रतिक्रिया आशा देवी यांनी दिली. आशा देवी यांनी प्रसारमाध्यमांचे आभार मानताना देशातील इतर पीडित मुलींनाही न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

‘हा निकाल फक्त आमच्यासाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी आहे. संपूर्ण समाजाचा आहे. यासाठी मी सर्वोच्च न्यायालय, समाज आणि प्रसार माध्यमांचे आभार मानते. आपल्या सर्वांना न्याय मिळाला आहे. जो प्रकार माझ्या मुलीसोबत घडला, त्याचे दु:ख कायम असेल. जोपर्यंत आम्ही जिवंत असू, तोपर्यंत त्या घटनेचे दु:ख कायम असेल. न्याय मिळायला वेळ लागला. मात्र अखेर न्याय मिळाला,’ अशा शब्दांमध्ये निर्भयाची आई आशा देवी यांनी निकालानंतर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. निर्भयाच्या वडिलांनीदेखील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल समाधान व्यक्त केले.