आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणात ईडीने अटक केली तेव्हा स्वाती मालिवाल नाराज होऊन अमेरिकेत गेल्या होत्या, असा दावा करण्यात येत होता. या दाव्यावर स्वाती मालिवाल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्या इंडिया टुडेने घेतलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होत्या.

आप पक्षावरील नाराजीबाबत स्पष्टीकरण देताना स्वाती मालिवाल म्हणाल्या, “मी हार्वर्ड कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेला गेले होते. आप कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या विविध भेट आणि शुभेच्छा कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. ज्या वेळी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली, तेव्हा अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या बहिणीला कोविड झाला. माझे सर्व सामान तिथे होते. त्यामुळे मलाही कॉरंटाईन व्हावं लागलं. पण मी त्या वेळी जे काही करू शकत होते ते मी करत होते. त्यामुळे मी पक्षात कार्यरत नव्हते असं म्हणणं वेदनादायी आहे.”

हेही वाचा >> गुजरातच्या राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग; २७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये १२ चिमुरड्यांचा समावेश

अरविंद केजरीवाल तुरुंगात असताना स्वाती मालीवाल, राघव चढ्ढा आणि हरभजन सिंग यांच्यासह आपचे राज्यसभा खासदार दिल्लीत उपस्थित नव्हते आणि त्यामुळे पक्षाच्या नेतृत्वावर नाराजी पसरली होती, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. शिवाय, अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली तेव्हा लंडनमध्ये असताना राघव चड्ढा यांना वेगळी वागणूक का दिली गेली, असाही प्रश्न स्वाती मालिवाल यांनी उपस्थित केला. “मला मारहाण करण्याचे कारण असेल तर मला हे समजून घ्यायचे आहे की मला अशी वागणूक का दिली गेली आणि लंडनमध्ये असलेल्या राज्यसभा खासदारांना रेड कार्पेट रिसेप्शन का दिले गेले?” मालीवाल यांनी चढ्ढा यांचे नाव न घेता विचारले.

राघव चड्ढा यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया

राघव चड्ढा यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया लंडनमध्ये झाली होती आणि ते बराच काळ देशाबाहेर होते. यापूर्वी, दिल्लीच्या एका मंत्र्याने असे सांगितले होते की खासदाराला डोळ्याचा गंभीर आजार झाला आहे ज्यामुळे अंधत्व येऊ शकते.

स्वाती मालिवाल भाजपच्या संपर्कात असून सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर हे सर्व करत असल्याच्या ‘ आप’च्या आरोपाबाबत विचारले असता स्वाती मालीवाल म्हणाल्या, “ज्या क्षणी मी अरविंद केजरीवाल यांचे सहाय्यक बिभव कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली, त्यानुसार माझ्यावर असे आरोप होणारच होते.

अरविंद केजरीवाल यांचे सहाय्यक बिभव कुमार यांनी स्वाती मालिवाल यांना मारल्याचा दावा स्वाती मालिवाल यांच्याकडून केला जातोय. याप्रकरणाचा तपसास पोलिसांकडून करण्यात येतोय. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तिला साथ-आठ वेळा लाथाबुक्क्यांनी मारण्यात आला, असा आरोप स्वाती मालिवाल यांनी केला.