गुजरातच्या राजकोट शहरातील एका गेमिंग झोनमध्ये शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली. यामध्ये जवळपास २७ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. टीआरपी गेम झोन येथे लागलेल्या आगीत अनेक लहान मुले आणि मोठी माणसे अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री उशीरा लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

राजकोटचे जिल्हाधिकारी प्रभाव जोशी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, “दुपारी सव्वा चार वाजता कंट्रोल रूमला आग लागल्याची माहिती देणारा फोन आला. त्यानंतर तातडीने अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. आग लागल्याच्या ठिकाणी ढिगाऱ्यात शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.”

युवराज सिंह सोलंकी नावाच्या माणसाचा हा गेमिंग झोन आहे, अशी माहिती राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी दिली. गेमिंग झोनच्या मालकावर निष्काळजीपणाचा आणि त्यामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर पुढील तपास सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी एक्सवरून या घटनेबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, आग लागल्याची माहिती मिळताच महानगरपालिका आणि प्रशासनाला तात्काळ दक्ष राहण्यास सांगितले गेले. गेमिंग झोनमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींवर योग्य ते उपचार तातडीने करावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.